विश्वासू नोकरांनीच दाखवलं काम, मालकाच्या खात्यावर कोट्यवधींचा डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 07:46 AM2022-04-01T07:46:13+5:302022-04-01T07:50:50+5:30
समूहाचे प्रमुख समीर सोमय्या यांची के. जे. सोमय्या ही ट्रस्ट असून त्यात सोमय्या यांच्या आत्या लीलाबेन कोटक (९२) विश्वस्त आहेत
मनीषा म्हात्रे
मुंबई : गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून कामावर असलेल्या विश्वासू नोकरांनीच के.जे. सोमय्या ट्रस्टच्या वयोवृद्ध विश्वस्तांच्या खात्यातील कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमय्या उद्योगसमूहातील प्रशासन विभागाचे व्यवस्थापक राजीव राठोड (४४) यांच्या फिर्यादीवरून गावदेवी पोलीस तपास करत आहे.
समूहाचे प्रमुख समीर सोमय्या यांची के. जे. सोमय्या ही ट्रस्ट असून त्यात सोमय्या यांच्या आत्या लीलाबेन कोटक (९२) विश्वस्त आहेत. त्यांच्या कंपनीमध्ये काम करणारे भूपेंद्र शहा (७५) मागील ४० वर्षांपासून सोमय्या यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे बँक व्यवहार हाताळत आहे. त्या पती माधवजी कोटक यांच्यासोबत पेडर रोड परिसरात राहतात. मुले नसल्याने त्यांच्याकडे अंगद चौरसिया ४० वर्षांपासून तेथेच राहून घरातील कामे करत होता. तसेच त्यांच्यासाठी साक्षी सुर्वे यांना मागील सहा महिन्यांपासून नर्स म्हणून कामावर ठेवण्यात आले.
कोटक दाम्पत्याच्या खात्यातून डाॅक्टरांची फी, औषधे, सोसायटीची बिले आणि नोकरांचे पगार आदी खर्च केलेले जातात. भूपेंद्र शहा हे सगळे व्यवहार पाहत होता. नोकर चौरसिया याला लीलाबेन यांच्या बँक खात्यातून पगार दिला जात होता. ४ फेब्रुवारीला भूपेंद्र कार्यालयाचा चालक नागेशसोबत लीलाबेन यांना विनाकारण भेटण्यास गेला. त्याबाबत समजताच राठोड यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी कोटक यांचे बँक खाते तपासले असता त्यांना धक्का बसला. दोघांनीही विश्वास संपादन करत या खात्यावर सव्वा कोटी रुपयांचा डल्ला मारल्याचे आढळले. त्यानुसार, बुधवारी त्यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत अजून कुणाला अटक केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामपियारे गोपीनाथ राजभर यांनी दिली.
असे वळते केले खात्यातून पैसे
कोटक दाम्पत्याच्या खात्यातून २०१९ मध्ये अंदाजे २५ लाख, २०२० मध्ये १८ लाख, २१-२२ मध्ये ३८ लाख असे एकूण ८० लाख रुपये सेल्फ चेकने काढल्याची माहिती समोर आली आहे. तर, अंगद चौरसिया याच्या खात्यावर पगाराव्यतिरिक्त १५ लाखांपर्यंत रक्कम जमा झाले. शहा त्यांची पत्नी मंजुला, मुलगा व नातवंडे यांच्या नावाने १८ लाख ५० हजार रुपये गेल्याचे दिसून आले.