फॅमिली डॉक्टरच रोखू शकतात कोरोनाची तिसरी लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:07 AM2021-05-10T04:07:25+5:302021-05-10T04:07:25+5:30

मुख्यमंत्र्यांची अपेक्षा : रुग्णांची विचारपूस, सततचा संवाद गरजेचा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोणत्याही आजारात रुग्ण पहिल्यांदा फॅमिली डॉक्टरशी ...

Only a family doctor can stop the third wave of corona | फॅमिली डॉक्टरच रोखू शकतात कोरोनाची तिसरी लाट

फॅमिली डॉक्टरच रोखू शकतात कोरोनाची तिसरी लाट

googlenewsNext

मुख्यमंत्र्यांची अपेक्षा : रुग्णांची विचारपूस, सततचा संवाद गरजेचा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोणत्याही आजारात रुग्ण पहिल्यांदा फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेत ‘माझा डॉक्टर’ बनून सर्वसामान्य रुग्णांना मार्गदर्शन केल्यास सुरुवातीच्या टप्प्यातच कोरोनाची तिसरी लाट रोखण्यात मोठी मदत होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी रविवारी मुंबईतील ७०० खासगी डॉक्टरांशी संवाद साधला आणि सर्व डाॅक्टरांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. घरीच विलगीकरणात असलेल्या रुग्णांकडे डाॅक्टरांनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे. या रुग्णांना प्रोटोकॉलप्रमाणे उपचार मिळतात किंवा नाही याकडे व्यक्तिश: लक्ष द्यावे तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांनाही योग्य ती माहिती वेळोवेळी दिल्यास रुग्णांच्या बाबतीत पुढील व्यवस्थापन करणे पालिकेला सोपे जाईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून या चर्चासत्रांचे आयोजन केले जात आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करत थेट तळागाळात काम करणाऱ्या डाॅक्टरांशी बोलण्याचा, त्यांच्या सूचना ऐकण्याचा हा उपक्रम आहे. येत्या काळात राज्यातील इतर विभागांतील डाॅक्टरांशीही अशा पद्धतीने संवाद साधला जाणार आहे.

टास्क फोर्सकडून शंकांचे निरसन

यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित तसेच डॉ. तात्याराव लहाने यांनी कोरोना काळातील उपचार पद्धतीवर डॉक्टर्सना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले.

लहान मुलांकडे लक्ष ठेवा

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात ठेवून राज्यात बालरोगतज्ज्ञांची एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे. याविषयी या सभेत माहिती देण्यात आली. तसेच लहान मुलांच्या वर्तणुकीतील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दूध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Only a family doctor can stop the third wave of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.