मातोश्रीबाहेर किती शिवसैनिक जमले? राणे म्हणाले, मी मोजायला सांगितले; थेट आकडेच दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 05:26 PM2022-04-23T17:26:54+5:302022-04-23T17:46:54+5:30
मातोश्री आणि राणा दाम्पत्याच्या घराबाहेर किती शिवसैनिक उपस्थित? नारायण राणेंनी आकडे सांगितले
मुंबई: मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी अखेर माघार घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येत आहेत. त्यांच्या दौऱ्यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माघार घेत असल्याचं राणा दाम्पत्यानं जाहीर केलं. मात्र शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. मातोश्रीच्या बाहेर आणि राणा दाम्पत्याच्या घराबाहेर मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित आहेत. यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पोलिसांनी राणा दाम्पत्याला सुरक्षित घराबाहेर काढावं, अन्यथा थोड्याच वेळात मी त्यांच्या निवासस्थानी जाईन, असं राणे पत्रकार परिषदेत म्हणाले. राणा दाम्पत्यानं नेमकं काय केलंय, त्यांच्यावर कोणती केस आहे, असे प्रश्न राणेंनी उपस्थित केले. आम्ही विधानं केल्यावर लगेच नोटीस येते. मग शिवसेनेचे खासदार संजय राऊत थेट धमक्याच देत असताना पोलीस त्यांच्यावर मेहरबान का, असा सवाल त्यांनी विचारला.
राणा दाम्पत्य भडकले! आमच्या घराबाहेर व्हा; नेण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत बाचाबाची
बाळासाहेब ठाकरे यांनी हात वर केला की लाखो शिवसैनिक जमायचे. मात्र उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर कोणीही शिवसैनिक बाहेर पडत नाहीत. इथे येण्यापूर्वी मी मुद्दाम मातोश्री आणि राणा दाम्पत्याच्या घराबाहेरचे शिवसैनिक मोजायले सांगितले होते. मातोश्रीच्या बाहेर फक्त २३५ शिवसैनिक आणि राणांच्या घराबाहेर केवळ १२५ शिवसैनिक उपस्थित आहेत. हजारो शिवसैनिक रस्त्यावर अशा स्वरुपाचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. मात्र त्यात तथ्य नाही, असं राणे म्हणाले.
खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस; शिवसेनेच्या ९२ वर्षांच्या 'फायर आजी' आहेत तरी कोण?
संजय राऊत, अनिल परब असे मोजकेच नेते सध्या दिसत आहेत. सत्तेत शिवसैनिक दिसत नाही. सरकारमध्ये दिसत नाही. पण भीती वाटल्यावर शिवसैनिक आठवतो. बाळासाहेब हृयात असताना शिवसेनेचा दरारा होता. मात्र आता तसं काहीच दिसत नाही. असंच होत राहिलं तर पुढील निवडणुकीच शिवसेनेचे दहा-पंधरा आमदार पण निवडून येणार नाहीत, अशा शब्दांत राणेंनी सेनेवर टीका केली.