मुंबई : एखाद्या पुरुषाने दोन लग्न केल्यास आणि दोघींनीही त्याच्या पैशांवर हक्क सांगितला तर कायद्यानुसार हक्कासाठीचा दावा केवळ पहिली पत्नीच करू शकते. मात्र, दोन्ही पत्नींच्या मुलांना त्यांच्या वडिलांचे पैसे मिळू शकतात, असे न्या. एस.जे. काथावाला व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने म्हटले.
औरंगाबाद खंडपीठाने अशाच आशयाचा निकाल एका प्रकणात दिल्याची बाब सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी न्यायालयाला दिली.रेल्वे पोलीस फोर्समधील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश हातणकर यांचा ३० मे रोजी कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून ६५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्यांच्या दोन्ही पत्नींनी नुकसानभरपाईच्या रकमेवर हक्क सांगितला. दुसऱ्या पत्नीची मुलगी श्रद्धाने वडिलांच्या पैशातील योग्य वाटा देण्याची विनंती न्यायालयाला केली.
सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी मंगळवारी सांगितले की, न्यायालय या याचिकेवर अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत सरकार नुकसानभरपाईची रक्कम न्यायालयात जमा करेल. कायदा असे म्हणतो की, दुसºया पत्नीला कदाचित काहीच मिळू शकत नाही. मात्र, दुसºया पत्नीची मुलगी, पहिली पत्नी आणि पहिल्या पत्नीची मुलगी, हे पैसे मिळण्यास पात्र आहेत.
हातणकर यांची पहिली पत्नी शुभदा व मुलगी सुरभी या न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होत्या. हातणकर यांचे दुसरे कुटुंब असल्याची माहिती नसल्याचे या दोघींनी न्यायालयाला सांगितले. त्यावर श्रद्धाच्या वकिलांनी या दोघींनाही याची कल्पना असल्याचे न्यायालयाला सांगितले. हातणकर हे दुसरी पत्नी व मुलीसोबत रेल्वे पोलीस क्वार्टरमध्ये राहत होते, अशी माहिती श्रद्धाच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने पहिल्या पत्नीला व मुलीला हातणकर यांच्या दुसºया विवाहाची कल्पना होती की नव्हती, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
हातणकर यांचा पहिला विवाह १९९२ आणि दुसरा विवाह १९९८ मध्ये झाला. श्रद्धाने केलेल्या याचिकेनुसार, हातणकर यांच्या दोन्ही विवाहांची हिंदू विवाह कायद्यांतर्गत नोंदणी झाली आहे. हातणकर यांच्या दुसºया पत्नीची मुलगी म्हणून वडिलांच्या सेवानिवृत्ती वेतनावर आपलाही अधिकार आहे. त्यामुळे तिचा व तिच्या आईचा राज्य सरकारने व रेल्वेने दिलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेवर समान अधिकार आहे, असे श्रद्धाने याचिकेत म्हटले आहे.