...ही खेळी गुजराती मतांसाठीच

By admin | Published: March 6, 2016 03:38 AM2016-03-06T03:38:12+5:302016-03-06T03:38:12+5:30

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी फॅक्टरबरोबरच भाजपासाठी निर्णायक ठरलेली गुजराती मतं वळविण्यासाठी काँगे्रसनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे़ त्यामुळे २०१२च्या निवडणुकीत भाजपातून आलेले

... this is only with the Gujarati votes | ...ही खेळी गुजराती मतांसाठीच

...ही खेळी गुजराती मतांसाठीच

Next

मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी फॅक्टरबरोबरच भाजपासाठी निर्णायक ठरलेली गुजराती मतं वळविण्यासाठी काँगे्रसनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे़ त्यामुळे २०१२च्या निवडणुकीत भाजपातून आलेले प्रवीण छेडा यांनाच विरोधी पक्षनेते पद देण्याची राजकीय खेळी काँग्रेसने केली़ वरकरणी हे काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण दिसून येत आहे़ मात्र ऐन निवडणुकीच्या काळात प्रवीण छेडा यांच्या रूपाने भाजपाच्या बाजूने असलेली गुजराती मते आकर्षित करण्याची काँग्रेसची ही व्यूहरचना असल्याचे बोलले जात आहे़
एकीचे बळ दाखवित गेली २१ वर्षे मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपा युतीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या वेळेस बेदिली माजली़ त्यामुळे सत्तेत वाटेकरी न ठेवता स्वबळावरच महापालिकेवर जिंकून येण्याची स्वप्न आता भाजपाला पडू लागली आहेत़ युतीच्या या भांडणात आपली पोळी भाजून घेण्यासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत़ परंतु आक्रमकतेत नेतृत्व कमी पडत असल्याने कधी मनसे तर केव्हा समाजवादीचे नेतेच भाव खाऊन जात आहेत़ हीच संधी साधून विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांची उचलबांगडी करीत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी गुरुदास कामत गटाला हादरा दिला़
मुंबईच्या अध्यक्षपदी येताच निरुपम यांनी कामत गटाचे अमरजीत सिंह मनहास यांना मुंबई काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदावरून हटवत आपले निकटवर्तीय असलम शेख यांची वर्णी लावली़ त्याचवेळी विरोधी पक्षनेतेपद बदलण्यासाठीही हालचालीने वेग घेतला होता़ मात्र निवडणुकांपर्यंत आंबेरकरच नेते राहतील, असे संकेत असल्याने कामत गटाचे नेते तयारीला लागले होते़
दुसऱ्या पक्षातून आलेल्या व्यक्तीला नेतेपद देण्यास काँग्रेसमधील काहींचा विरोधही होता़ त्यामुळे या पदासाठी सुरुवातीपासून दावेदार असलेले छेडा यांचे नाव मागे पडले होते़ मात्र निरुपम अध्यक्षपदी येताच छेडा यांचे प्रयत्न नव्याने जोमाने सुरू झाले होते़
विरोधी पक्षनेतेपदी छेडाच का?
प्रवीण छेडा यांची ही चौथी टर्म आहे़ २० वर्षे नगरसेवकपदाचा दांडगा अनुभव असलेले छेडा गेली तीन टर्म भाजपामध्ये होते़ मात्र २०१२च्या निवडणुकीत पक्षाने तिकीट कापले म्हणून नाराज झालेले छेडा यांनी काँग्रेसची वाट धरली़ संभाषण चातुर्य, प्रदीर्घ अनुभव, आक्रमकता यामुळे छेडा यांची अखेर विरोधी पक्षनेते पदी वर्णी लागली़ (प्रतिनिधी)गुजराती चेहऱ्याचा
असाही फायदा
उत्तम वक्तृत्व व संभाषण चातुर्याच्या जोरावर अनेकवेळा भाजपाने शिवसेनेची बाजू महापालिकेत सावरली आहे़ त्यामुळे भाजपाला अडविण्यासाठी त्यांच्याच पक्षातील गुजराती चेहरा काँग्रेसला हवा होता़ तसेच निवडणुकीच्या काळात गरज पडणारा मोठा फंडही छेडा खेचून आणतील, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे़सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी विरोधी पक्षनेते पद हे आक्रमक असावे लागते़ मात्र २०१२च्या निवडणुकीनंतर काँगे्रसमध्ये अनुभवी कमी आणि नवखेच जास्त झाले़, त्यामुळे काँग्रेसपुढे पर्याय उरला नाही़ अशावेळीच छेडांच्या नावाचा विचार सुरू होता़
दुसऱ्या पक्षातून आलेल्या व्यक्तीकडेच पक्षाचे नेतृत्व सोपविले, तर पक्षात नाराजी पसरेल म्हणून काँग्रेसने काही काळ सबुरीचा मार्ग स्वीकारला़ या काळात मुरली देवरा गटाचे ज्ञानराज निकम यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आले़ मात्र त्या काळात काँग्रेसची बाजू कमकुवत पडल्यामुळे कामत गटाचे नगरसेवक देवेंद्र आंबेरकर यांना पद देण्यात आले़

Web Title: ... this is only with the Gujarati votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.