हवाई दलाच्या मदतीनेच करता येईल ‘ऑक्सिजन कोंडी’वर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:05 AM2021-04-15T04:05:49+5:302021-04-15T04:05:49+5:30
मुंबई : राज्यात कोरोनाचा आलेख वाढत आहे. रुग्णालयांत बेड्स मिळत नसल्याने गंभीर प्रकृतीच्या रुग्णांत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ...
मुंबई : राज्यात कोरोनाचा आलेख वाढत आहे. रुग्णालयांत बेड्स मिळत नसल्याने गंभीर प्रकृतीच्या रुग्णांत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. प्राणवायूची ही कोंडी वेळीच न सुटल्यास मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हवाईमार्गे ऑक्सिजनच्या वाहतुकीस परवानगी देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. परंतु, विमानाद्वारे ऑक्सिजनची वाहतूक शक्य आहे का, असल्यास त्याचा खर्च राज्याला परवडेल का, याविषयी हवाई वाहतूक तज्ज्ञ तसेच ‘मॅब एव्हिएशन’चे व्यवस्थापकीय संचालक मंदार भारदे यांच्याशी केलेली चर्चा...
................
* हवाई मार्गाने ऑक्सिजनची वाहतूक शक्य आहे का?
मुख्यमंत्र्यांनी हवाई दलाच्या विमानांद्वारे ऑक्सिजनची वाहतूक करण्यास परवानगी मागितली आहे. त्यांची मागणी रास्त आहे. कारण, हवाई दलाकडील मोठ्या सामानवाहू विमानांद्वारे ऑक्सिजनची वाहतूक करणे सहज शक्य आहे. आपत्कालीन स्थितीत कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी या विमानांचा वापर करता येतो. केंद्राने हिरवा कंदील दाखविल्यास त्या क्षणापासून पुढच्या पाच तासांत हवाई दलाच्या मदतीने पूर्वेकडील राज्यांतून ऑक्सिजनचा साठा महाराष्ट्रात आणता येऊ शकतो.
* हवाई दलाव्यतिरिक्त खासगी विमानांचा वापर करता येईल का?
भारतात सध्या उपलब्ध असलेली खासगी सामानवाहू विमाने तुलनेने लहान आहेत. त्यामुळे अवजड मालाच्या वाहतुकीसाठी त्यांचा वापर करणे खर्चीक ठरू शकते. शिवाय वायू किंवा द्रवपदार्थांच्या वाहतूक परवानगीसाठी त्यांना वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांकडे अर्ज करावा लागेल. ही प्रक्रिया खूपच क्लिष्ट आहे. परवानगी मिळेपर्यंत किती महिने लागतील, याचा अंदाज घेणेही कठीण आहे. याउलट हवाई दलाच्या सामानवाहू विमानांची वहनक्षमता अधिक आहे. ही विमाने एकाचवेळी एक लाख किलो वजन वाहून नेऊ शकतात. परवान्यांच्या अडथळ्याची शर्यतही त्यांना पार करावी लागत नाही.
* वाहतूक खर्च परवडेल का? बचतीचे उपाय सांगा.
आपल्याकडे सध्या ऑक्सिजनची टंचाई असल्यामुळे खर्चाकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय नाही. बचतीचा मार्ग म्हणजे पहिले पाच दिवस विमानांद्वारे ऑक्सिजन महाराष्ट्रात आणावा, त्याचवेळी रेल्वे आणि रस्ते मार्गानेही प्राणवायू आणण्याची व्यवस्था करावी. एकदा राज्यात पुरेसा ऑक्सिजन साठा झाला की विमान मार्गाद्वारे येणारी आवक बंद करावी आणि अन्य मार्गाने सुरू ठेवावी. कायमस्वरूपी हवाईमार्गे वाहतूक करण्याची गरज नाही.
(मुलाखत - सुहास शेलार)
..............................