केवळ गरजूंना मदत केली; कोणतेही अयोग्य काम केले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:11+5:302021-06-30T04:06:11+5:30
अभिनेता सोनू सूदचा उच्च न्यायलायत अर्ज अभिनेता सोनू सूदचा उच्च न्यायालयात अर्ज लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनावरील औषधांची ...
अभिनेता सोनू सूदचा उच्च न्यायलायत अर्ज
अभिनेता सोनू सूदचा उच्च न्यायालयात अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनावरील औषधांची ज्यांना खरोखर आवश्यकता होती, अशा गरजूंनाच मदत केली. ज्या ठिकाणी औषधे उपलब्ध होती मात्र, गरजूंपर्यंत पोहोचत नव्हती, अशा ठिकाणी आपण औषधे पोहोचवण्याचे काम केले, असे बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. आपण कोणतेही अयोग्य काम केले नाही, असा दावा सूदने केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्य सरकारकडे रेमडेसिविर यांसारख्या कोरोनावरील औषधांचा तुटवडा असताना काही राजकीय नेत्यांनी व सेलिब्रिटींनी या औषधांचे वाटप केले. याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या काही याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आपलेही म्हणणे ऐकण्यात यावे, यासाठी सोनू सूदने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने यासंदर्भात बेकायदेशीर होर्डिंग्ज लावण्यात आले होते का? आणि औषधांचे बेकायदेशीर वाटप करण्यात आले होते की नाही, याचा तपास करण्याचे निर्देश सरकारला दिले होते.
मंगळवारच्या सुनावणीत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सोनू सूदचा अर्ज दाखल करून घेतला आहे. जनहित याचिकांमध्ये आपल्याला प्रतिवादी करण्यात यावे, अशी विनंती सूदने अर्जाद्वारे केली आहे.
या अर्जाद्वारे सूदने आपण कोणतेही अयोग्य काम केले नसल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्ते आपले परोपकारी कार्य संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच आपल्याला बदनाम करण्याचाही प्रयत्न करत आहेत, असे सूदने अर्जात म्हटले आहे.
देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर लोक औषध, ऑक्सिजन सिलिंडर मिळवण्यासाठी लोकं धावाधाव करत होती. काही ठिकाणी औषधे व ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होते, पण गरजूंपर्यंत पोहोचत नव्हते. अशा स्थितीत मी केवळ औषधे गरजूंपर्यंत पोहोचवली, असे सूदने अर्जात म्हटले आहे.
याआधीच्या सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकार याबाबत तपास करत असून संबंधितांना नोटीस बजावल्याचे न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी बुधवारी ठेवली आहे.