परिसंस्था पुनरुज्जीवित केल्या, तरच पृथ्वी वाचेल; अन्यथा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:05 AM2021-06-05T04:05:52+5:302021-06-05T04:05:52+5:30
जागतिक पर्यावरण दिन विशेष लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्तचा यावर्षीचा ‘नैसर्गिक परिसंस्थांचे पुरुज्जीवन’ हा संदेश केवळ ...
जागतिक पर्यावरण दिन विशेष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्तचा यावर्षीचा ‘नैसर्गिक परिसंस्थांचे पुरुज्जीवन’ हा संदेश केवळ या वर्षासाठी मर्यादित नाही, तर पुढील दहा वर्षांसाठी आहे. या दशकात आपल्याला पृथ्वी वाचविण्यासाठी काम करावे लागेल. कारण त्यानंतर आपल्या हातात वेळ नसेल. अनेक घातक परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे शक्यतो आतापासूनच वाळवंटे, डोंगर, जंगल, बर्फाळ प्रदेश, समुद्र, अशा विविध परिसंस्था वाचविण्यासाठी सर्वच स्तरांवर प्राधान्याने काम सुरू झाले पाहिजे, असे मत निसर्गतज्ज्ञ अविनाश कुबल यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
१. परिसंस्था म्हणजे काय? त्यांचा विनाश कसा झाला?
परिसंस्था म्हणजे पृथ्वीवरील विविध प्रकाराच्या रचना. वाळवंट, डोंगर, बर्फाळ प्रदेश, समुद्र या वेगवेगळ्या भाैगाेलिक किंवा निसर्गत: निर्मिती परिसंस्था आहेत. शहर, नागरीकरण ही मानवनिर्मित परिसंस्था आहे. औद्योगिक क्रांतीनंतर आपण औद्योगिक उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली. खाणकामामुळे तेथील माती काढली गेली. उत्खनन झाले. माती वाहून गेली. परिणामी, जमिनीतून निघणारे उत्पादन कमी झाले. मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वापर झाल्याने जमिनीचा कस, पोत कमी झाला. अशा अनेक क्रियांमुळे परिरचनांचे नुकसाने झाले. चार-पाचशे वर्षांपूर्वी एवढे प्रदूषण नव्हते. गेल्या काही वर्षांचा विचार केल्यास पृथ्वीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
२. परिसंस्थांचे पुनरुज्जीवन कसे करता येईल?
पृथ्वीवरील साधनांचा वापर करताना तारतम्य न बाळगल्याने त्यांची हानी झाली. पृथ्वीला तिच्या मूळ स्वरूपात न्यायचे असेल, तर परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करावे लागेल. पृथ्वीचे जे काही नुकसान केले आहे त्याची भरपाई कोणत्या मार्गाने करता येईल; याचा विचार केला पाहिजे. जंगल, पाणथळ जागा वाचविण्यासाठी सुरुवात केली पाहिजे.
३. याचा हवामानावर परिणाम झाला का?
आपण निसर्गावर आघात केले. त्यामुळे हवामानाचे चक्र बिघडले. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळत असल्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. पूरस्थिती निर्माण होत आहे. जमिनी वाहून जात आहेत. नागरीकरणामुळे उष्ण पाण्याचे प्रमाण आणि त्यामुळे समुद्राच्या पाण्याची उष्णता वाढत आहे. परिणामी, समुद्राच्या पाण्याचे बाष्प होण्याची क्रिया झपाट्याने होत आहे. बाष्प वाढल्याने ढग होण्याची क्रिया वाढते. त्यामुळे अतिवृष्टीसारख्या घटना घडतात. समुद्रातील प्रदूषण वाढल्याने जलचर मृत होत आहेत. पक्षी दुर्मीळ होत आहेत. उपाय म्हणजे तिवरांचे जंगल, समुद्र किनारे वाचविले पाहिजेत.
४. परिसंस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी कसे काम केले पाहिजे?
स्थानिक स्तरावर काम होणे गरजेचे आहे. कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्राधान्याने काम केले पाहिजे. केंद्र आणि राज्याने कायद्याची चौकट उभी करून अंमलबजावणीवर भर दिला पाहिजे. भविष्यातलील धोका ओळखून वर्तमानातील आपले वर्तन सुधारायला हवे. नियमांचे पालन करायल हवे. आपली परिसंस्था तंदुरुस्त राहील यासाठी कृती करायला हवीए; अन्यथा त्याचे दुष्परिणाम विध्वंस, विनाशाच्या रूपात भोगावे लागतील.
(मुलाखत : सचिन लुंगसे)
..................................................