मुंबई, दि.18 - २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी नरे पार्क ( परळ )येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मराठी माध्यमाच्या पालकांच्या महासंमेलनाची आयोजनपूर्व बैठक मालाड येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या उत्कर्ष मंदिर या शाळेत पालकांच्या मोठ्या उत्साहात पार पडली. मुलांना इंग्रजी माध्यमात घालून आम्ही त्यांना घरी मराठी शिकवू ही भूमिका फसवी असून मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल असा सूर मराठी अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या या बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त अशोक परांजपे, शाळेचे कार्याध्यक्ष संजय तळेगावकर हेही उपस्थित होते.
मराठी अभ्यास केंद्राच्या शाळा गटाच्या प्रमुख डॉ. वीणा सानेकर मराठी माध्यमाचे महत्त्व सांगताना म्हणाल्या की, जागतिकीकरणाच्या बाजारात आम्ही आमच्या भाषेलाही उभे केले आणि जास्त पगार देणाऱ्या नोकऱ्या हव्यात म्हणून मग मुलांना इंग्रजी माध्यमात घालून त्यांचे रेसचे घोडे केले. मराठी माध्यमात मुलाला आनंददायक शिकता तर येतेच, शिवाय व्यक्तिमत्त्वविकासासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळही असतो, हे त्यांनी स्वतःच्या मुलीचे उदाहरण देऊन सांगितले. केवळ मराठी भाषा दिन साजरा करून आणि गुढीपाडव्याला मिरवणुका काढून मराठी भाषा आणि संस्कृती टिकणार नाही तर मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृती जिवंत राहील, असेही डॉ. सानेकर म्हणाल्या.
पालक संमेलनाचे समन्वयक आनंद भंडारे यांनी महाराष्ट्रात प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या या पालक संमेलनामागील मराठी अभ्यास केंद्राची भूमिका स्पष्ट केली. मुलाच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाइतकाच पालकही महत्त्वाचा असतो. मराठी माध्यमातील पालकवर्ग एकवटून आपल्या पाल्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. असे जागृत झालेले पालक मग आपल्या मुलाच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याबाबत आग्रही राहतील. भंडारे यांनी संमेलनाचे स्वरूपही पालकांसमोर मांडले.
शाळेचे कार्याध्यक्ष संजय तळेगावकर हे शाळेचे माजी विद्यार्थीही आहेत. शाळेत चालणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन, व्यवस्थापन मार्गदर्शन, नृत्य, चित्रकला इ. कलागुणांना संधी देणारे उपक्रम याविषयी माहिती सांगितली. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी अधिकाधिक उत्कृष्ट कसा होईल याकडे शाळेतील शिक्षक जातीने लक्ष देतात असे ते म्हणाले.
बैठकीला उपस्थित असणाऱ्या अनेक पालकांनी महासंमेलनाला पूरक नवनवे उपक्रम, सूचना मांडल्या. एकवीरा शाळा, मालवणी शाळा, उत्कर्ष मंदिर, दौलत हायस्कूल, शैलेंद्र शाळा इ. शाळांमधील बांद्रे ते दहिसर या परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दौलत हायस्कूलचे मुख्याध्यापक गजानन झाडे आणि मालवणी शाळेचे संस्थापक फिरोज शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.