महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कुर्ला बेस्ट बस अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालात बसमध्ये कोणताही दोष नसल्याचे निष्पन्न झाले असले तरी याबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बेस्टने फक्त मॅन्युअल गीअर असलेल्या बस चालविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) बनवली असून अद्याप नवीन ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक बस चालविण्यासाठी अशी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली नाहीत. कंत्राटी बस ड्रायव्हरना ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक गाड्या चालविण्याचे योग्य प्रशिक्षणच मिळाले नसल्याचे उघड झाले आहे. बेस्ट ड्रायव्हरचे प्रशिक्षण आणि सुरक्षेच्या निकषांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बेस्टमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेस्टच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कायमस्वरूपी सेवेत येणाऱ्या बस ड्रायव्हरना सुरुवातीला ४ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते, तसेच त्यांचे मूल्यमापनही करण्यात येते; परंतु कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणाऱ्या ड्रायव्हरसाठी मात्र अशी प्रशिक्षण प्रक्रिया राबवण्यात येत नाही.
कंत्राटी ड्रायव्हरची मनमानी कधी संपणार?
मुळात राज्य परिवहन विभागाचे याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट धोरण नसल्याचे उघड झाले आहे. २ वाढत्या ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यभरातील सर्वच संस्थांसाठी मॅन्युअलबरोबर ऑटोमेंटिक गाडी चालविण्याची मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे आवश्यक आहे. मात्र, ती प्रक्रिया अजूनही झालेली नसल्याचे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यातही प्रशिक्षण कार्यशाळेसाठी अनेक कंत्राटी चालक हजरच राहत नसल्याचे बेस्टच्या निवृत्त प्रशिक्षकांनी सांगितले. त्यामुळे कंत्राटी ड्रायव्हरच्या या मनमानीवर बेस्टचा वचक आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे.
बेस्टकडे कायमस्वरूपी तत्त्वावर भरती केलेले ११ हजारांपेक्षा अधिक ड्रायव्हर असणे आवश्यक आहे. सध्या त्यांची संख्यादेखील निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. बेस्टमध्ये गेली कित्येक वर्षे ड्रायव्हर आणि कंडक्टरची भरती झाली नसल्याने येत्या काळात बेस्ट या सार्वजनिक उपक्रमाचे रूपांतर खासगी उपक्रमामध्ये होण्यास वेळ लागणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
बेस्टने काय करणे अपेक्षित?
- स्वमालकीच्या बसचा पुरेसा ताफा असणे.
- कायमस्वरूपी ड्रायव्हर आणि कंडक्टरची भरती करणे.
- कंत्राटी ड्रायव्हरला योग्य प्रशिक्षण देणे.
- त्यांची नियमित आरोग्य आणि मानसिक तपासणी करणे.
आमच्याकडे ऑटोमॅटिक बस चालविण्याबाबत सध्या एसओपी नाही ही बाब खरी आहे. दरम्यान, बेस्ट समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाला नवीन एसओपी तयार करण्याबाबत पत्र देण्यात येईल. त्याबाबत त्यांचे मार्गदर्शन घेणार आहोत. - सुदास सावंत, जनसंपर्क अधिकारी, बेस्ट उपक्रम