...तरच घराबाहेर पडा; ओमायक्रॉनमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मुंबईत निर्बंध लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 09:31 AM2021-12-06T09:31:18+5:302021-12-06T09:31:52+5:30
मुंबईत सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर १५ ऑगस्टपासून दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर देखील ०.०२ टक्के एवढा आहे. कोविड प्रतिबंधक लसींचा पहिला डोस शंभर टक्के नागरिकांनी घेतला आहे. तर ७५ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, कोविडचा नवीन प्रकार ओमायक्रॉन या विषाणूचे आव्हान आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. मात्र, हाच नियम आता सर्वत्रच लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मॉल, दुकान अथवा कार्यालयातदेखील लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांनाच प्रवेश देण्यात येत आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण - १,६५,९८,९९६
१८ वर्षांवरील लोकसंख्या - ९२ लाख ३६ हजार ५००
पहिला डोस घेतलेले - ९६,०६,४३१
दोन्ही डोस घेतलेले -६९,९२,५६५
लसीकरण असेल तरच बसचा प्रवास
* दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांनाच बेस्ट बसमध्ये प्रवेश देण्याचा नियम करण्यात आला आहे. बेस्ट उपक्रम मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहे.
* बेस्ट बसमधून दररोज २८ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत प्रत्येक बस प्रवाशांनी भरलेली असते. त्यामुळे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रत्येकाचे प्रमाणपत्र तपासणे बस वाहकांसाठी डोकेदुखीचे कारण ठरत आहे.
रेल्वे स्थानकांवरही परवानगी नाही...
मुंबईत सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर १५ ऑगस्टपासून दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. हा नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची तरतूद आहे.
... तर बाजारात साहित्यही मिळणार नाही
मुंबईतील सुमारे पाच लाख नागरिकांनी दुसऱ्या डोसची मुदत चुकवली असल्याचे समोर आले आहे. दोन्ही डोस घेतल्यास कोविडचा प्रभाव जाणवणार नाही. त्यामुळे दुकान, मॉल आदी ठिकाणी दोन डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
रोज ३५ ते ४० हजार तपासण्या
मुंबईत कोविड चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. मागील काही महिन्यांमध्ये दररोज २५ ते ३० हजार चाचण्या होत होत्या. मात्र आता काही दिवसांपासून दररोज सरासरी ३५ ते ४० हजार चाचण्या केल्या जात आहेत.
४४९ लसीकरण केंद्रे
मुंबईत महापालिका, सरकारी आणि खासगी मिळून एकूण ४४९ लसीकरण केंद्रे आहेत. दररोज दीड ते दोन लाख नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. यापैकी सरासरी एक लाख लाभार्थ्यांना दररोज लस मिळत आहे.