केवळ मालाड, दहिसरमध्ये रुग्ण वाढण्याचे प्रमाण सरासरीहून अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:28 AM2020-06-02T01:28:22+5:302020-06-02T01:28:29+5:30
एप्रिल महिन्यात रुग्णवाढ दुप्पट होण्याचे प्रमाण सात दिवसांवर होते. हे प्रमाण २० दिवसांवर आणण्यासाठी आठ सनदी अधिकाऱ्यांची फौज ८ मे पासून मुंबईत कार्यरत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे मुंबईत दररोज सरासरी दीड हजार रुग्ण सापडत असताना रुग्णवाढ होण्याचे प्रमाण सरासरी ३.८५ टक्के एवढे आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भायखळा- नागपाडा, वरळी-प्रभादेवी, धारावी- माहीम, सायन-वडाळा या विभागांमध्ये दररोज रुग्ण वाढण्याचे प्रमाण अवघे दोन ते तीन टक्क्यांवर आले आहे. केवळ मालाड आणि दहिसर विभागात अद्याप हे प्रमाण सरासरी सात टक्के एवढे आहे.
मुंबईत सोमवारी १४१३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता एकूण ४० हजार ८७७वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत १३१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र एकूण बाधित रुग्णांपैकी १६ हजार ९८७ लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांपैकी बहुतांश बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची प्रत्यक्षात संख्या जवळपास सात हजार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
एप्रिल महिन्यात रुग्णवाढ दुप्पट होण्याचे प्रमाण सात दिवसांवर होते. हे प्रमाण २० दिवसांवर आणण्यासाठी आठ सनदी अधिकाऱ्यांची फौज ८ मे पासून मुंबईत कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी अखेर रुग्णवाढ दुप्पट होण्याचे प्रमाण मुंबईत १६ दिवसांवर आले आहे. तर काही विभागात हे प्रमाण २० दिवसांवर गेले आहे. त्यानंतर आता मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांपैकी जवळपास ८० टक्के विभागांमध्ये रुग्णवाढ दररोज वाढण्याचे प्रमाण पाच टक्क्यांहून कमी असल्याचे आढळून आले आहे.
रुग्णवाढ दुप्पट होण्याचे प्रमाण
च्इ (भायखळा, नागपाडा), एफ/उत्तर(सायन, वडाळा), जी/दक्षिण(वरळी, प्रभादेवी), जी/उत्तर(धारावी, माहीम), एच/पूर्व (वांद्रे पूर्व), एम/पूर्व (देवनार, गोवंडी) विभागांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण सरासरी २० दिवस आहे.
च्डी (ग्रँट रोड, मलबार हिल) विभाग १९ दिवस, ए (फोर्ट, चर्चगेट, कुलाबा) आणि एल (कुर्ला) विभाग १७ दिवस, के/पश्चिम (विले पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी,) १८ दिवस, बी (डोंगरी, मोहम्मद अली रोड) १६ दिवस