Join us

नऊ तासांच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांना सापडली फक्त एकच उत्तरपत्रिका

By admin | Published: April 18, 2017 6:08 AM

दहिसरच्या इस्त्रा विद्यालय हायस्कूलमधून चोरी झालेल्या विज्ञान विषयाच्या उत्तरपत्रिकेच्या शोधासाठी पोलिसांनी रविवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वैशाली नगरात सुमारे नऊ

मुंबई : दहिसरच्या इस्त्रा विद्यालय हायस्कूलमधून चोरी झालेल्या विज्ञान विषयाच्या उत्तरपत्रिकेच्या शोधासाठी पोलिसांनी रविवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वैशाली नगरात सुमारे नऊ तास शोधमोहीम राबविली. मात्र, त्यांना केवळ एकच उत्तरपत्रिका मिळाली असून, अद्याप १४९ उत्तरपत्रिका गायब आहेत. या प्रकरणी अटक केलेल्या विक्रम हरीश शर्मा (वय २०), अकिक रब्बानी शेख (२०) यांच्यासह दोघा अल्पवयीन मुलांकडे कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. इतिहास, संस्कृत व विज्ञान या विषयांच्या एकूण ५१६ उत्तरपत्रिका चोरीला गेल्या होत्या. त्यापैकी विज्ञान वगळता अन्य विषयांच्या पत्रिका मिळाल्या आहेत. रविवारी तीन अधिकाऱ्यांसह ३३ पोलीस आणि स्थानिक १० तरुणांसह उद्यानातील परिसर पिंजून काढण्यात आला. मात्र, केवळ एकच उत्तरपत्रिका सापडली. आरोपींनी उत्तरपत्रिकांच्या पिशव्या जंगलातील पायवाटेवर ठेवल्या आणि त्यावर पालापाचोळा घालून लपविल्या होत्या. त्यावरील पाला उडाल्यानंतर एखाद्याने त्या उचलून नेल्या असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इस्रा विद्यालय हायस्कूलमधून ३ एप्रिलला मुख्याध्यापक सुरेंद्र पाठक यांच्या कॅबिनमधून उत्तरपत्रिका चोरण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)रद्दीसाठी इस्त्रा विद्यालयातून या उत्तरपत्रिका पळवण्यात आल्या होत्या. चोरट्यांना त्या विकून पैसे कमवायचे होते. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होताच त्यांनी अथक परिश्रमाअंती या प्रकरणाचा छडा लावला. परंतु, अद्याप केवळ एकच उत्तरपत्रिका पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे उर्वरित १४९ उत्तरपत्रिका शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.