मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व पुलांचे पुन्हा नव्याने आऑडिट करण्यात आले. मात्र, यामध्ये शहर भागातील केवळ हिंदमाता हा एकमेव पूल चांगल्या स्थितीत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. उर्वरित सर्व ७२ पुलांची छोटी अथवा मोठी दुरुस्ती सुचविण्यात आली आहे.
मार्च, २०१९ मध्ये हिमालय पूल कोसळून सात पादचाऱ्यांचा मृत्यू तर ३० लोक जखमी झाले. ऑडिटच्या अहवालात हा पूल सुस्थितीत असल्याचे ऑडिटरने सांगितले होते. त्यामुळे या दुर्घटनेनंतर सर्वच पुलांच्या ऑडिटबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली. त्यानुसार पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट करण्यात आले, तर शहर भागातील पुलांसाठी नवीन ऑडिटर नेमण्यात आला.
मुंबईत एकूण ७९ पूल आहेत. पहिल्यांदा या पुलांचे ऑडिट करणारे स्ट्रक्चरल आॅडिटर डी. डी. देसाई यांनी १९ पुलांची मोठी दुरुस्ती सुचविली होती, परंतु नवीन आॅडिटरने केलेल्या पुन:ऑडिटमध्ये आणखी २० पूल म्हणजे एकूण ३९ पुलांची मोठी दुरुस्ती सुचविली आहे.ग्रँट रोड पूल, प्रिन्सेस स्ट्रीट पादचारी पूल, ग्लोरिया चर्च उड्डाणपूल, पी डीमेलो पादचारी पूल आणि डॉकयार्ड पादचारी पुलाचा मोठ्या दुरुस्तीमध्ये समावेश आहे.
एकाही पुलाची पुनर्बांधणी नाही
शहर भागातील सर्व पुलांचे आॅडिट करण्यासाठी स्ट्रक्टवेल डिझाइनर्स अँड कन्सल्टंट प्रा. लि. ची नियुक्ती करण्यात आली होती. देसाई कंपनीने केलेल्या पहिल्या आॅडिटनुसार १७ पूल चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले होते. नवीन ऑडिटमध्ये एक पूल चांगल्या स्थितीत असल्याचे समोर आले आहे. पहिल्या अहवालात ४३ पुलांची छोटी दुरुस्ती तर १९ पुलांची मोठी दुरुस्ती सुचविण्यात आली होती, परंतु नवीन आॉडिटमध्ये ३९ मोठी दुरुस्ती आणि ३३ छोटी दुरुस्ती सुचविण्यात आली आहे.
शहरातील ७९ पुलांच्या पहिल्या ऑडिटनुसार धोकादायक ठरविण्यात आलेल्या सहा पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने अतिधोकादायक पूल पाडण्यास सुरुवात केली. यामध्ये मरिन लाइन्स आणि चर्नी रोड पादचारी पुलांचा समावेश आहे, तर म्हाडा आणि रेल्वेच्या हद्दीतील पुलांची दुरुस्ती संबंधितांनी हाती घेतली असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. मात्र, यामध्ये सुदैवाने एकाही पुलाची पुनर्बांधणी करण्याची वेळ आलेली नाही.