मुंबई : ओला, उबर या खासगी टॅक्सींवर निर्बंध आणावेत, या मागणीसाठी जय भगवान महासंघातर्फे टॅक्सी-रिक्षांचा संप पुकारण्यात आला आहे. मात्र, या संपाला मुंबईतील अन्य युनियनने पाठिंबा दिलेला नाही. सरकारशी या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता संपाचे हत्यार उपसून प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नसल्याची भूमिका अन्य युनियनने मांडली आहे. ओला, उबर टॅक्सींमुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांचा रोजगार बुडत आहे. यामुळे ओला, उबेरसारख्या खासगी सेवांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी जय भगवान महासंघातर्फे करण्यात येत आहे. या मागणीसाठी २१ जून रोजी आझाद मैदान येथे आंदोलनही करण्यात आले आणि त्याला हिंसक वळणही लागले होते. त्यानंतर, पुन्हा एकदा ही मागणी महासंघातर्फे उचलून धरण्यात आली आहे. त्यासाठी २६ जुलै रोजी टॅक्सी-रिक्षा संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. याबाबत महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई येथे मोठ्या प्रमाणात बंद पाळण्यात येईल, असा दावा केला आहे. या बंदला कोणतेही गालबोट लागणार नाही. मागील वेळी आझाद मैदान येथे टॅक्सी चालकांचा मेळावा घेण्यात आला होता आणि त्याला हिंसक वळण लावून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न अन्य युनियनकडून करण्यात आल्याचा आरोप सानप यांनी केला. या वेळी बंद शांतपणे करणार असल्याचे ते म्हणाले. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे महासचिव ए.एल.क्वाड्रोस यांनी सांगितले की, ‘ओला, उबरवर निर्बंध आणावेत, यासाठी राज्य सरकारशी बोलणी सुरू आहेत आणि त्यावर लवकरच निर्णय होईल. त्यामुळे आता बंद पुकारण्यात काही अर्थ नाही. ज्या संघातर्फे बंद पुकारण्यात आला आहे, त्यांनी आमच्याशीदेखील कोणताही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आम्ही संपात सामील होणार नाही,’ असे ते म्हणाले. ‘स्वाभिमान टॅक्सी युनियननेही संपाला पाठिंबा दिलेला नाही. मागण्या सारख्याच आहेत आणि त्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र, संपाला नाही. ज्या टॅक्सी चालकांना संपात सामील होण्याची इच्छा असेल ते होतील,’ असे स्वाभिमान टॅक्सी युनियनचे मुंबई अध्यक्ष के. केतिवारी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
एकच संघटना संपामध्ये उतरणार
By admin | Published: July 25, 2016 4:45 AM