Join us

Mumbai News चार सार्वजनिक शौचालयांतील केवळ एक महिलांसाठी; प्रजा फाउंडेशनच्या अहवालात उघड 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 9:57 AM

गेली दोन वर्षे पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात असल्याने अनेक नागरी प्रश्न कायम असल्याचा  निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे. 

मुंबई : सार्वजनिक शौचालयांचे प्रमाण, हवेची गुणवत्ता, नदी-समुद्रातील प्रदूषण, नागरिकांच्या तक्रारींची दखल आदी विविध नागरी समस्यांवर प्रजा फाउंडेशनच्या ताज्या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यानुसार गेली दोन वर्षे पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात असल्याने अनेक नागरी प्रश्न कायम असल्याचा  निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे. 

मुंबईतील नागरी समस्यांची सद्य:स्थिती २०२४’ या नावाने अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात मुख्य प्रकाश सार्वजनिक शौचालयांवर टाकण्यात आला असून मागणीच्या तुलनेत शौचालयांची संख्या खूपच कमी असल्याचे चित्र  स्पष्ट झाले. अहवालातील आकडेवारीनुसार दर चार सार्वजनिक शौचालयांतील केवळ एक शौचालय महिलांसाठी आहे.  एका सार्वजनिक शौचालयांचा वापर ८६ पुरुष करतात, तर महिलांचे प्रमाण ८१ आहे. 

स्वच्छ भारत  अभियानानुसार एका शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या ३५, तर महिलांची २५ असायला हवी.  मुंबईत ८२ हजार ४०७ सार्वजनिक शौचालय असून केवळ एक तृतीयांश झोपड्पट्टीवासीयांसाठी ती आहेत.

१) मानकानुसार झोपडपट्ट्यांमध्ये एका शौचालयाचा वापर ३५ पुरुषांनी आणि २५ महिलांनी करावा. मात्र प्रत्यक्षात ८६ पुरुष आणि ८१ महिला एकाच शौचालयाचा वापर करतात.

 २) व्यापारी व सांस्कृतिक कारणांमुळे जास्त वर्दळ असणाऱ्या सी वॉर्डात (मरीन लाईन्स, चिरा बझार, गिरगाव ) ६ शौचालयांमागे महिलांसाठी फक्त एकच शौचालय आहे.

३) नोकरी आणि व्यवसायानिमित्त लोकांचा जास्त राबता असणाऱ्या ए आणि बी वॉर्डात पुरुष आणि महिलांसाठी शौचालयाचे प्रमाण अनुक्रमे ३:१ आणि ४: १ असे आहे.

४) ई वॉर्डातील २४९ आणि एफ-दक्षिण वॉर्डातील ११९ वापरकर्त्यांसाठी एकच शौचालय उपलब्ध आहे.

५) एच -पश्चिम वॉर्डात ४४३ लोकांमागे एकच शौचालय आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका