मुंबईत केवळ एका गर्भवतीचे लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:06 AM2021-07-20T04:06:27+5:302021-07-20T04:06:27+5:30

मुंबई : अन्य शहरांच्या तुलनेत लसीकरणात आघाडीवर असलेली मुंबई गर्भवतींच्या लसीकरणाबाबत मात्र पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. कारण आतापर्यंत ...

Only one pregnant woman in Mumbai has been vaccinated | मुंबईत केवळ एका गर्भवतीचे लसीकरण पूर्ण

मुंबईत केवळ एका गर्भवतीचे लसीकरण पूर्ण

Next

मुंबई : अन्य शहरांच्या तुलनेत लसीकरणात आघाडीवर असलेली मुंबई गर्भवतींच्या लसीकरणाबाबत मात्र पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. कारण आतापर्यंत मुंबईत केवळ एका गर्भवतीचे लसीकरण पूर्ण झाले असून, ५० जणींनी पहिला डोस घेतल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुले आणि गर्भवतींना असल्याचा इशारा जागतिक संघटनांनी दिला आहे. असे असतानाही मुंबईतील गर्भवती महिला लसीकरणाबाबत गंभीर नसल्याचे यातून दिसून येत आहे. गर्भवतींच्या सोयीसाठी मुंबई पालिकेने १५ जुलैपासून शहर आणि उपनगरात एकूण ३५ ठिकाणी विशेष लसीकरण केंद्रे तयार केली आहेत. मात्र गर्भवतींकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे या केंद्रांवर तैनात कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

काही गर्भवती मातांशी चर्चा केली असता बहुतांश जणींच्या मनात लसीच्या सुरक्षेबाबत संभ्रम असल्याचे दिसून आले. लसीमुळे जन्माला येणाऱ्या बाळाच्या शरीरावर काही विपरीत परिणाम होऊ नये, या धास्तीने त्या लसीकरणासाठी घराबाहेर पडत नाहीत. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसींमुळे बाळ किंवा तिच्या आईवर कोणतेही विपरीत परिणाम होणार नसल्याचे जागतिक संघटनांच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे न डगमगता लस घ्यावी आणि जन्माला येणाऱ्या बाळालाही कोरोनापासून दूर ठेवावे, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.

- किती मुंबईकरांनी पहिला डोस घेतला - ५१ लाख ३६ हजार ८५९

- किती जणांचे लसीकरण पूर्ण झाले - १५ लाख ४१ हजार २९२

- एकूण लसीकरण - ६६ लाख ७८ हजार १५१

- पहिला डोस घेतलेल्या गर्भवतींची संख्या - ५०

- दोन्ही डोस घेतलेल्या गर्भवतींची संख्या - १

.......

दोन जीवांची भीती

लस घेतल्यानंतर ताप येणे, जुलाब-उलट्या यांसारखे प्रकार बऱ्याच जणांसोबत घडले आहेत. मी तर दोन जीवांची असल्यामुळे लस घेण्यास भीती वाटते.

- प्रीती भानुशाली, गर्भवती माता

...

गर्भवती महिलांसाठी लस सुरक्षित आहे की नाही याचा अभ्यास अद्याप झालेला नाही. लस घेतल्यानंतर धडधाकट माणसांवरही परिणाम झालेले दिसून येतात. त्यामुळे या अवस्थेत लस घ्यावी की नाही याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे.

- निर्मला कणसे, गर्भवती माता

......

न घाबरता लस घ्या!

- लस घेतलेल्या गर्भवती महिलांमध्ये विपरीत परिणाम दिसून आल्याची एकही घटना भारतात नोंद नाही. त्यामुळे येथील दोन्ही लसी या गर्भवतींसाठी सुरक्षित आहेत.

- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुले आणि गर्भवती मातांना असल्याचा इशारा आरोग्य क्षेत्रातील संस्थांनी दिला आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी लस हाच एकमात्र उपाय आहे.

- कोरोना प्रतिबंधक लस ही प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाला तिच्यापासून धोका असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गर्भवतींनी न घाबरता लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.

Web Title: Only one pregnant woman in Mumbai has been vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.