मुंबईत दिसली विरोधकांची एकी, आंदोलनानंतरही वाहतूक सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 05:44 AM2018-09-11T05:44:14+5:302018-09-11T05:45:35+5:30

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला.

The only one of the protesters seen in Mumbai, even after the agitation, the traffic is smooth | मुंबईत दिसली विरोधकांची एकी, आंदोलनानंतरही वाहतूक सुरळीत

मुंबईत दिसली विरोधकांची एकी, आंदोलनानंतरही वाहतूक सुरळीत

Next

मुंबई : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या खांद्याला खांदा लावत मनसेने बंदमध्ये आक्रमक सहभाग घेत, बेस्ट बसेसची तोडफोड करत रास्ता रोकोसह रेल व मेट्रो रोखण्याचा प्रयत्न केला. ‘बंद’च्या धसक्याने दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. मात्र, मुंबईतील वाहतूक सुरळीत सुरू होती.
भारत बंद’च्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी बेस्ट बसेसची तोडफोड केली. मुंबई पोलिसांनी रात्रीपासूनच मनसे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. आक्रमक झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांना सोमवारीही ताब्यात घेण्यात आले, तर डझनहून अधिक कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. विरोधी पक्षांच्या रोषाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सामोरे जावे लागले. सिद्धिविनायक मंदिरात टपाल तिकिटाच्या अनावरणासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी अंधेरी येथे रेल रोको केल्याने, मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन आक्रमकपणे पुढे नेण्यास सुरुवात केली. लालबाग, भायखळा, वाशी नाका, प्रतीक्षानगर येथे बेस्ट बसेसची तोडफोड केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यास सांगितले असले, तरी कार्यकर्त्यांमधील रोषामुळे काही ठिकाणी बेस्ट बसेसची तोडफोड झाल्याची प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. सरकारने इंधन दरात कपात करून महागाई कमी केली नाही, तर भविष्यात मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशाराही नांदगावकर यांनी दिला.
> अशा घडल्या घटना...
मुंबईतील भायखळासह आग्रीपाडा, भोईवाडा, काळाचौकी पोलीस ठाण्यासह ठिकठिकाणी पोलिसांनी मनसे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली.
अंधेरी येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी रेल रोको करत, भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांना अशोक चव्हाण व संजय निरूपम यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
मनसे कार्यकर्त्यांनी दक्षिण मुंबईत बेस्टच्या तीन बसेस फोडल्या. या प्रकरणी पोलिसांनी मनसे नेते बाळा नांदगावकर, भायखळा विभागाध्यक्ष विजय लिपार आदींसह मनसेच्या डझनभर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसे कार्यकर्त्यांनी भाजपा नगरसेवक विनोद मिश्रा यांचे मालाडच्या कुरार गावातील कार्यालय दुपारच्या सुमारास फोडले.
>मुंबईत ८ गुन्हे दाखल,
६ जणांना अटक
चेंबूरमधील वाशी नाका परिसरात काही कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान बेस्टच्या बसवर दगडफेक केली. प्रतीक्षानगर बस डेपोतही काही बसची तोडफोड केली. काळाचौकी, आग्रीपाडा, भायखळा, पायधुनी कांदिवली, वडारपाडासह शहरातील विविध भागात रास्ता रोकोसह बसची तोडफोड केली. याप्रकरणी ८ गुन्हे मुंबईत दाखल केले असून ६ जणांना अटक केली. तर, ८८२ आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. आंदोलन शांत झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

Web Title: The only one of the protesters seen in Mumbai, even after the agitation, the traffic is smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.