Join us  

फक्त एका रेल्वे कर्मचा-यासाठी ट्रेनचा रोज १५ मिनिटे खोळंबा

By admin | Published: October 17, 2015 12:27 PM

फक्त एका रेल्वे कर्मचा-याला गाडी पकडता यावी म्हणून पनवेल-वसई ट्रेन रोज १५ ते २० मिनिटे उशीराने धावते.

ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. १७ - मुंबईकरांची लाईफलाईन असलेली रेल्वे सतत धावत असते आणि तिच्यामुळे प्रवासीही निश्चिंत असतात.. पण पनवेल- वसई मार्गावरील प्रवाशांचा मात्र सध्या रोज खोळंबा होतो. कोपरला ही ट्रेन रोज १५ ते २० मिनिटे उशीरा येते. रोजच्या या खोळंब्याला वैतागलेल्या प्रवाशांचा अखेर आज उद्रेक झाला आणि त्यांनी आंदोलन छेडले.
प्रवाशांच्या या उद्रेकानंतर रेल्वे चालकाला जाब विचारला असता रेल्वेच्या एका कर्मचा-या रोज ही ट्रेन पकडता यावी म्हणून ही ट्रेन लेट करण्याचे आदेश स्टेशन मास्तरने दिल्याचे त्याने सांगितले. तो कर्मचारी ट्रेनमध्ये चढला की मगच १५ ते २० मिनिटांच्या खोळंब्यानंतर ही ट्रेन पुढे धाऊ लागते. 
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी मात्र असा कोणताही प्रकार घडत नसल्याचे स्पष्ट केले आहे. एखादा तांत्रिक बिघाड किंवा कोणतीतरी मोठी अडचण असेल तरच ट्रेन थांबवली जाते. एखाद्या कर्मचा-याला ट्रेन पकडता यावी म्हणून ट्रेन थांबवायला लागलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे असे प्रकार कधीच घडत नाहीत आणि याआधीही अशी घटना कधीच घडली नाही असा दावा त्यांनी केला. मुळात रेल्वे चालकाला अशा प्रकारची कोणतेही वक्तव्य करण्याचे अधिकार नसून त्याने दिलेली माहिती संपूर्णपणे चुकीची आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येईल, असे सिंग यांनी सांगितले.