माहुलकरांना सुरक्षित स्थळी हलविणे हाच एकमेव पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:10 AM2019-03-10T01:10:41+5:302019-03-10T01:10:47+5:30

आयआयटीचे राज्य शासनाला निवेदन; आंदोलनाचा १५३ वा दिवस

The only option is to move the safe place to the public | माहुलकरांना सुरक्षित स्थळी हलविणे हाच एकमेव पर्याय

माहुलकरांना सुरक्षित स्थळी हलविणे हाच एकमेव पर्याय

Next

मुंबई : माहुल हा परिसर मुलभूत सेवा सुविधांपासून वंचित आहे. परिणामी पहिल्यांदा येथे मुलभूत सेवा सुविधा पुरविल्या पाहिजेत, अशा सुचनांचे निवेदन आयआयटी मुंबईने राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाला दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे येथे मुलभूत सेवा सुविधा पुरविल्या तरी येथील नागरिकांचे जगणे मुश्किल आहे. कारण येथील वायू प्रदूषण घातक आहे. परिणामी माहुलकरांना सुरक्षित स्थळी हलविणे हा एकमेव पर्याय असल्याचे आयआयटी मुंबईने म्हटले असून, माहुलकरांच्या आंदोलनाचा शनिवारी १५३ वा दिवस होता.

माहुल येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागणीकडे अद्यापही सरकारने लक्ष दिलेले नाही. येथे पाच हजार कुटूंब राहत असून, प्रदूषणाने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. परिणामी, आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांनी आंदोलन पुकारले आहे. आंदोलनादरम्यान मुंबई महापालिकेने येथील रहिवाशांना एमएमआरडीए, म्हाडा, एसआरएसारख्या प्राधिकरणांकडून घरे मिळण्याबाबतचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र संबंधित प्राधिकरणांकडून आंदोलनकर्त्यांना काहीच प्राप्त झालेले नाही. माहुलमधील रासायनिक कारखान्यांमुळे येथील हवा प्रदूषित आहे. प्रदूषणामुळे येथे अनेकांचा मृत्यू झाला असून, सर्वच रहिवासी प्रदूषणाचा सामना करत आहेत. माहुल परिसर मानवी वस्तीस योग्य नाही, असा अहवालही यापूर्वी आला आहे. प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. पुनर्वसनासाठी प्रकल्पग्रस्तांनी ‘जीवन बचाओ आंदोलन’ सुरू केले आहे. मात्र आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही.

शहर आणि उपनगरातील विविध प्रकल्पग्रस्त विशेषत: तानसा जलवाहिनीत घर गमावलेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन प्रशासनाने माहुल येथे केले आहे.
दीड ते दोन वर्षांपासून प्रकल्पग्रस्त रहिवासी येथील प्रदूषणाने त्रस्त झाले असून, दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अपुऱ्या सुविधा, प्रदूषण अशा विविध समस्यांनी ग्रासलेले पुनर्वसित माहुलवासीय स्थलांतराच्या मागणीवर ठाम आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली असता, केवळ आश्वासनेच देण्यात आली.
हताश नागरिकांनी पूर्वी ते ज्या भागात राहायचे त्या भागातील आमदारांना प्रश्न विचारले. मात्र काहीच कार्यवाही झाली नाही.
रहिवासी विस्थापित झाले असले तरीही अद्याप ते पूर्वी राहात असलेल्या विभागातील मतदार यादीत समाविष्ट आहेत. त्यामुळे जबाबदारी तेथील लोकप्रतिनिधींची आहे.
वासाने गरगरणे, दम लागणे, खोकला येणे, अंगावर खाज येणे, डोळे दुखणे, पोटांचे विकार, असे अनेक आजार येथील रहिवाशांना होत आहे.
माहुलमध्ये मृत्यू पावलेल्या शंभरहून अधिक लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी ‘जीवन बचाओ’ आंदोलनच्या शंभराव्या दिवशी मौन रॅली काढली होती.
तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र समितीसह आयआयटीची समिती नेमण्यात आली. समितीने जो अहवाल मांडला, त्या अहवालातून ही जागा म्हणजे माहुल माणसांना राहण्यायोग्य नाही हे समोर आले.

Web Title: The only option is to move the safe place to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.