Join us

कोविन ॲपवर नोंदणीकृत खासगी केंद्रांनाच लसीकरणाची परवानगी, सोसायट्यांसाठी पालिकेची सुधारित नियमावली 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 9:34 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates : कांदिवली येथील सोसायटीमध्ये बोगस लसीकरण झाल्याचे गेल्या महिन्यात उजेडात आले. त्यानंतर मुंबईत आणखी दहा ठिकाणी असे बनावट लसीकरणाचे प्रकार उघडकीस आले आहेत.

मुंबई - बोगस लसीकरणाचे काही धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिकेने आता गृहनिर्माण सोसायट्यांमधील लसीकरणासंदर्भात सुधारित नियमावली आणली आहे. त्यानुसार कोविन ॲपवर नोंदणी झालेल्या खासगी केंद्रच सोसायट्यांमध्ये लसीकरण घेऊ शकतील, असे स्पष्ट केले आहे. तसेच अशा ९५ अधिकृत खासगी लसीकरण केंद्रांची यादीही प्रशासनाने जाहीर केली आहे.

कांदिवली येथील सोसायटीमध्ये बोगस लसीकरण झाल्याचे गेल्या महिन्यात उजेडात आले. त्यानंतर मुंबईत आणखी दहा ठिकाणी असे बनावट लसीकरणाचे प्रकार उघडकीस आले आहेत. हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचल्यामुळे पालिकेने लसीकरण मोहिमेसाठी सुधारित नियमावली तयार केली आहे. त्यानुसार सोसायट्यांनी केवळ केंद्र सरकारच्या कोविन ॲपवर नोंदणी झालेल्या खासगी केंद्रांकडूनच लसीकरण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सोसायट्याच्या नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी....

सोसायटी आणि नोंदणीकृत लसीकरण केंद्रात करार झाला आहे का? हे पडताळणे करणे. लसीकरणाची तारीख, लसीची किंमत, केंद्राचे नाव याची माहिती बोर्डावर लिहिणे. प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष तयार करावे. ही सर्व माहिती महापालिका आणि स्थानिक पोलिस ठाण्याला तीन दिवस आधी द्यावी. काही चुकीची घटना घडत असल्यास तात्काळ पोलिस ठाण्याला कळवावे. लाभार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र मिळेल, याची व्यवस्था करावी. काहीही समस्या असल्यास महापालिकेची हेल्पलाईन १९१६ ला संपर्क करावा.

आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्याची जबाबदारी....

सोसायटी येथे रुग्णवाहिका आहे का, जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करून ठेवणे. लसीकरण करताना कोविन ॲपवर आणि गूगल शीटमध्ये लाभार्थ्यांची नोंदणी होत आहे का? याची पडताळणी करणे. निवड करण्यात आलेल्या खासगी लसीकरण केंद्राची कोविन ॲपवर नोंदणी आहे का, याची खात्री करावी. लसीकरण सुरू असताना अधूनमधून लसीकरणाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई