सावरकरांचे विचारच हिंदू समाजाला तारून नेतील : डॉ. नीरज देव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:07 AM2021-05-12T04:07:17+5:302021-05-12T04:07:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सावरकर हे एकमेव असे समाजसुधारक होते होते की, त्यांना धर्माची आवश्यकताच वाटत नव्हती. मात्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सावरकर हे एकमेव असे समाजसुधारक होते होते की, त्यांना धर्माची आवश्यकताच वाटत नव्हती. मात्र दुर्दैवाने त्यांच्या समाज क्रांतीबाबत निकोप दृष्टीने पाहिले गेले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बहुआयामी असे व्यक्तिमत्त्व होते. त्यातही विशेष म्हणजे ते समाज क्रांतिकारी होते आणि कोणत्याही धर्मग्रंथाला प्रमाण न मानता त्यांनी विज्ञानवादी दृष्टीने समाजसुधारणा स्वीकारली. जाती प्रथा सुधारण्यापेक्षा त्या उखडून काढण्याकडे त्यांचा भर होता. त्यांच्या काळात जे बुद्धिवादी सुधारक होते त्यांनाही धर्माची आवश्यकता काही ना काही प्रमाणात वाटली. मात्र सावरकरांना धर्माची आवश्यकता वाटली नव्हती. यामुळेच सावरकरांचे विचारच हिंदू समाजाला तारून नेतील, असे प्रतिपादन डॉ. नीरज देव यांनी केले.
सावरकर स्मारकाने सोमवारी आयोजित केलेल्या वीर सावरकर कालापानी मुक्ती शताब्दी ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते.
सामाजिक क्रांतिवीर सावरकर या विषयावर ते पुढे म्हणाले की, सात बेड्या म्हणजे वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधूबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी या सावरकरांनी तोडल्या. शिवाशिवीचा प्रश्न त्यांनी लहानपणापासून पाहिला होता आणि त्याला त्यांचा ठाम विरोध होता. मानवता, बंधुता आणि विज्ञाननिष्ठा याबरोबरच राष्ट्रवादी बना, असे त्यांचे सांगणे होते. राष्ट्रवादी विचारातून त्यांनी शुद्धीबंदी मोडली, ते विवेकी सुधारक होते. धर्मभोळेपणा आणि अंधश्रद्धा यांना दाबून टाकले पाहिजे सर्व समाजाला बरोबर घेऊन जायचे आहे असे ते सांगत. रत्नागिरीमध्ये त्यांनी पतितपावन मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश दिला. जातिभेद व चातुर्वर्ण्यव्यवस्था नष्ट करण्यावर त्यांचा साततत्याने भर होता. आंबेडकरांनीही त्यांच्या या कार्याची नेहमीच प्रशंसा केली. इतकेच नव्हे तर बुद्धाच्या कार्याशी त्यांनी तुलना केली होती.
चातुर्वर्ण्याचे उच्छेदन केले पाहिजे असे ते म्हणत त्यांच्यामध्ये गौतम बुद्धासारखी कामाची दृष्टी होती, ध्येय होते. शिवाजी महाराजांचे चैतन्य होते, दयानंद यांचीही शक्ती होती, असे सावरकर यांचे चरित्रकार सांगतात, असा संदर्भ देव यांनी दिला.
.................................