मुंबईत उद्या मिळणार केवळ दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:09 AM2021-09-08T04:09:12+5:302021-09-08T04:09:12+5:30

मुंबई - आतापर्यंत मुंबईतील ७९ टक्के लाभार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ३१ टक्के नागरिकांनी दोन्ही ...

Only the second dose will be available in Mumbai tomorrow | मुंबईत उद्या मिळणार केवळ दुसरा डोस

मुंबईत उद्या मिळणार केवळ दुसरा डोस

Next

मुंबई - आतापर्यंत मुंबईतील ७९ टक्के लाभार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ३१ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी गुरुवारी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. मात्र, या दिवशी कोणालाही पहिला डोस दिला जाणार नाही.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत १८ वर्षांवरील ९५ लाख लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य आहे. दररोज एक लाख नागरिकांना लस देण्याचा निर्धार प्रशासनाने केला होता. त्यानुसार दररोज सरासरी ८० हजार ते एक लाख नागरिकांना लस देण्यात येते. शासकीय, महापालिका रुग्णालये मिळून ३२०, तर खासगी रुग्णालयात १३०, अशी एकूण ४५० लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. १ मे २०२१ पासून १८ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

दरम्यान, कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. लसीकरण मोहीम वेगाने पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे. त्यानुसार सर्व शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर गुरुवारी दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

१८ वर्षांवरील एकूण लाभार्थी - ९५ लाख

पहिला डोस घेतलेले - ७१ लाख २४ हजार ८२० (७९ टक्के)

दुसरा डोस घेतलेले - २८ लाख ५० हजार ५५४ (३१ टक्के)

* दुसऱ्या डोससाठी विशेष लसीकरण सत्र सर्वप्रथम ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या लसीकरण सत्रास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यादिवशी एक लाख ७९ हजार ९३८ लाभार्थ्यांना दुसरा डोस घेतला.

Web Title: Only the second dose will be available in Mumbai tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.