मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून राम मंदिर निर्माणाच्या विषयाचं जोरदार राजकारण केले जात आहे. प्रत्येकजण राम मंदिर निर्माणासंबंधी मोठ-मोठी विधानं करुन चर्चेत राहत आहेत. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राम मंदिर निर्माणासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
नेमके काय म्हणाले संजय राऊत?'राम जन्मभूमी न्यासच्या प्रमुखांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. केवळ शिवसेनेच्या प्रयत्नांमुळेच राम मंदिर उभारणं शक्य होऊ शकते, असा विश्वास न्यास प्रमुखांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेदेखील लवकरच अयोध्येला जाणार आहेत', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
(विरोधकही राम मंदिराला विरोध करू शकत नाहीत- मोहन भागवत)
काही दिवसांपूर्वी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही राम मंदिर निर्माणासंबंधी वक्तव्य केले आहे. ''देशातील बहुसंख्य समाज भगवान रामाची पूजा करत असल्यानं विरोधकही राम मंदिराला विरोध करू शकत नाहीत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते. संघ आणि भाजपा अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी कटिबद्ध आहेत. मात्र काही गोष्टींसाठी वेळ लागतो, असं भागवत म्हणाले होते. पतंजली योगपीठात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक सरकारच्या काही सीमा असतात, असं मोहन भागवत यांनी म्हटले.
'प्रत्येक सरकारच्या काही मर्यादा असतात. त्या मर्यादांमध्ये राहूनच त्यांना काम करावं लागतं. मात्र संत आणि पुरोहित यांना अशा कोणत्याही मर्यादा नसतात,' असं सरसंघचालक म्हणाले होते. 'विरोधी पक्षदेखील उघडपणे अयोध्येतील राम मंदिराला विरोध करू शकत नाही. कारण देशातील बहुसंख्य समाज हा भगवान रामाची पूजा करतो, याची त्यांना कल्पना आहे. मात्र काही गोष्टींसाठी वेळ लागतो. राम मंदिराची उभारणी नक्की होईल. पण त्यासाठी काही अवधी लागेल,' असं भागवत यांनी म्हटले होते. यावेळी सरसंघचालकांनी सरकारच्या मर्यादांवरदेखील भाष्य केलं. 'प्रत्येक सरकारच्या काही मर्यादा असतात. त्यामध्ये राहून सरकारचं काम चालतं. चांगलं काम करणारा पक्ष सत्तेत असायला हवा. कोण सत्तेत आहे, हे अतिशय महत्त्वाचं असतं,' अशा शब्दांमध्ये भागवत यांनी अप्रत्यक्षपणे सरकारचं समर्थन केलं. यावेळी रामदेव बाबा यांनी संत-महंत मंत्र्यांपेक्षा अधिक सक्षम असल्याचं प्रतिपादन केलं. 'ज्या ठिकाणी मंत्री, धनाढ्य व्यक्ती अपयशी ठरतात, त्याठिकाणी संत-महंतांना यश मिळतं. अनेकदा हे दिसून आलं आहे,' असं रामदेव बाबांनी म्हटलं.