Join us

फक्त सहा टक्के गिरणी कामगारांच्या पदरात घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 4:06 AM

वर्षानुवर्षे संघर्ष करणारे कामगार हतबल; सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या

मुंबई : मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर १०० कोटी रुपये खर्च करून टेक्सटाईल म्युझियम उभारण्याची तयारी मुंबई पालिका करत असतानाच गेल्या अनेक वर्षांपासून घरांसाठी झगडणाऱ्या गिरणी कामगारांची झोळी आजही रिकामीच आहे. घरांसाठी नोंदणी केलेल्या १ लाख ७५ हजारांपैकी आजवर फक्त ११ हजार ९७६ कामगारांनाच घरांचा ताबा मिळाला आहे. सरकारने वेळोवेळी केलेल्या घोषणा हवेतच विरल्याने हा कामगार हतबल झाला आहे.२८ जून, २०१२ रोजी ६,९२५, ९ मे, २०१६ रोजी २६३४ आणि २ डिसेंबर, २०१६ रोजी २४१७ अशा आजवर ११ हजार ९७६ घरांचे वाटप कामगारांना झाले आहे. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत एकही घर सरकारने उपलब्ध करून दिलेले नाही. मुंबईच्या ५८ गिरण्यांपैकी ३३ खासगी तर २५ राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) मालकीच्या होत्या. यापैकी बंद पडलेल्या ३३ खासगी गिरण्यांच्या जागांपैकी १८ गिरण्यांच्या ९.६८ हेक्टर जमिनीचा ताबा म्हाडाला मिळाला. तिथे ६ हजार ९४८ घरे उभारून कामगारांना देण्यात आली. मात्र, उर्वरित गिरण्यांची जमीन अद्याप मिळालेली नाही. २४, ऑगस्ट २०१० च्या शासन निर्णयानुसार गिरणी बंद झाल्यापासून ६ महिन्यांच्या आत किंवा शासनाच्या अधिसूचनेपासून ६ महिने यापैकी जो नंतर येईल त्या कालावधीत म्हाडा किंवा पालिकेस जागा हस्तांतरित करणे बंधनकारक आहे. मात्र, बंद पडलेल्या उर्वरित जमिनीचा ताबा शासनाने अद्याप घेतलेला नाही. तसेच, ठाणे, पनवेल, कल्याण-डोंबिवली या परिसरातील महसूल विभागाच्या १८४ एकर जागेवर या कामगारांसाठी घरे उभारण्याची घोषणाही झाली होती. मात्र, गृहनिर्माण विभागाकडून त्यावरील पुढील निर्णयच होत नसल्याची माहिती हाती आली आहे. बंद गिरण्यांच्या जागेवर २३ हजार घरांचीच उभारणी शक्य आहे. त्यामुळे पयार्यी मार्ग शोधावे लागणार आहे.६,२६३ घरांचे वाटप रखडलेगिरणी कामगारांना तातडीने घरे मिळावी यासाठी एमएमआरडीएच्या रेंटल हाउसिंग योजनेतील १० हजार ६७८ घरे राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, १६० चौरस फुटांची घरे लहान असल्याने दोन घरांचे एक घर करून २४१७ घरे या कामगारांसाठी राखून ठेवण्यात आली आहेत. परंतु, त्यांचे वाटप अद्याप झालेले नाही. बॉम्बे डाइंग (३३६४), श्रीनिवास (४८२) या दोन मिलमधील घरेसुद्धा तयार झाली आहेत. मात्र, त्यांचेही वाटप रखडले आहे.या सरकारकडून खूप अपेक्षामाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरणी कामगारांच्या हिताची भूमिका सातत्याने घेतली होती. मात्र, भाजप सरकारच्या काळात आमच्या पदरी निराशाच पडली. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत.- दत्ता इस्वलकर, गिरणी कामगार नेते