मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी करण्यात येणारी आॅनलाइन नोंदणीची मुदत संपली असून लॉटरीच्या अर्जविक्री आणि स्वीकृतीसाठीची मुदतही आता संपली आहे. म्हाडाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५५ हजार ३२४ अर्ज म्हाडासमोर सादर झाले आहेत. याचा अर्थ म्हाडाच्या कोकण विभागातील लॉटरीतील प्रत्येक घरासाठी फक्त ६ ते ७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे २५ तारखेला होणाऱ्या लॉटरीसाठी मिळालेला हा आतापर्यंतचा अत्यल्प प्रतिसाद मानला जात आहे.लॉटरीच्या अर्जविक्री स्वीकृतीची प्रकिया आता पूर्ण झाली आहे. सर्व छाननी नंतर वैध ठरलेल्या अर्जांची यादी बुधवारी २२ आॅगस्टला संध्याकाळी ६ वाजता म्हाडाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल. हे वैध ठरलेले अर्जदारच २५ आॅगस्टला होणाºया लॉटरीसाठी पात्र ठरतील. ही संगणकीय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात २५ आॅगस्टला सकाळी १० वाजता काढण्यात येईल.कोकण विभागाची ही आतापर्यंतची ९,०१८ घरांची सर्वांत मोठी लॉटरी आहे असा गाजावाजा म्हाडाकडून करण्यात आला. मात्र घरांच्या अवाजवी, महागड्या किमती, लॉटरीमध्ये उच्च उत्पन्न गटाला दिलेल्या झुकत्या मापामुळे या लॉटरीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली हे अर्ज स्वीकृतीची मुदत संपल्यानंतर आलेल्या आकड्यांवरून स्पष्ट झाले आहे. म्हाडाने याआधीच लॉटरीला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे ही लॉटरी आठवडाभर पुढे ढकलली होती. ९,०१८ घरांची एकत्र लॉटरी काढल्यानंतर अंदाजे लाखभर अर्ज येतील असा अंदाज म्हाडाकडून वर्तवण्यात येत होता. मात्र ६० हजारांच्या आतच अर्ज दाखल झाल्याने म्हाडाचा अंदाज चुकला. आतापर्यंतचा कोकण विभागीय लॉटरीत म्हाडाला मिळालेला हा सर्वांत अत्यल्प प्रतिसाद आहे. बुधवारपर्यंत हा आकडा फार काही वाढण्याची चिन्हे नसल्याने म्हाडाच्या विक्रमी घरांच्या विक्रीचे स्वप्न कोलमडले आहे.
एका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 5:15 AM