मालवेअर कोड शोधून काढून टाकण्यासह सॉफ्टवेअर बदलणे हाच उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:08 AM2021-03-04T04:08:21+5:302021-03-04T04:08:21+5:30

मुंबईला चीनचा शॉक : भारत सरकारने नेमलेल्या संस्थांनी काम करणे गरजेचे, तज्ज्ञांचे मत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गतवर्षी ...

The only solution is to change the software, including detecting and removing malware code | मालवेअर कोड शोधून काढून टाकण्यासह सॉफ्टवेअर बदलणे हाच उपाय

मालवेअर कोड शोधून काढून टाकण्यासह सॉफ्टवेअर बदलणे हाच उपाय

Next

मुंबईला चीनचा शॉक : भारत सरकारने नेमलेल्या संस्थांनी काम करणे गरजेचे, तज्ज्ञांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गतवर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरने केलेल्या तपासाचा अहवाल सादर झाला असून, दुसरीकडे रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनॅलिसिस या अमेरिकन कंपनीनेही २८ फेब्रुवारी रोजी एक अहवाल जारी केला. यात त्यांनी असे म्हटले आहे की, मुंबईच्या इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चीन देशांनी मालवेअर (व्हायरस) टाकल्याची शक्यता आहे. एका अर्थाने चीनने केलेल्या कुरापतीमुळे मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाल्याने भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळायच्या असतील तर भारत सरकारने या संदर्भात नेमलेल्या सुरक्षा एजन्सीकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावर चोखपणे काम करण्याची गरज आहे. शिवाय आपल्या वीज प्रकल्पात आपण जे चीनचे साहित्य किंवा जे सॉफ्टवेअर वापरत आहोत, ते काढून टाकण्याची गरज आहे. त्या बदल्यात दुसऱ्या कोणत्याही देशाचे उत्तम सॉफ्टवेअर वापरणे गरजेचे आहे. असे केल्यास साहजिकच भविष्यातील सायबर हल्ले टाळता येतील, असे मत सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘लोकमत’कडे मांडले.

सायबरतज्ज्ञ ॲड. डॉ. प्रशांत माळी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, भारत सरकारची नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर सेंटर या नावाची एजन्सी आहे. ती माहिती, तंत्रज्ञान कायदा २००० आयटी ॲक्टअंतर्गत बनवली आहे. करदात्यांचा खूप सारा पैसा भारत सरकार यावर खर्च करीत असते. त्यांचे काम हे ऊर्जा, बँका, रेल्वे यांसारख्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरची काळजी घेणे हे आहे. ‘कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ नावाची भारत सरकारची आणखी एक संस्था आहे. या संस्थेने महाराष्ट्र ग्रीडला या संदर्भातील इशारा दिला होता. ताे चायनीज मालवेअरबाबत होता.

दुसरी आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्ला चीनने केल्याचे समाेर आलेच आहे तर भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागणे गरजेचे आहे किंवा हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल करण्याची गरज आहे; कारण हा भारताच्या नागरिकांवर झालेला हल्ला आहे. महाराष्ट्र सरकारनेही याबाबत सजगता दाखविली पाहिजे. आमच्यासाठी तुम्ही सजगता का दाखविली नाही? असा सवाल त्यांनी केला पाहिजे. केवळ महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण भारतभरात जे प्रकल्प आहेत, त्यांत चिनी साहित्य आहे. जगभरात सर्वांना माहिती आहे की, चिनी साहित्यात मालवेअर सॉफ्टवेअर असते. ते कायम क्रियाशील नसते. जेव्हा एखादी घटना घडेल म्हणजे सीमेवर तणाव निर्माण होईल किंवा तत्सम; तेव्हा ते क्रियाशील केले जाते. अशा वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प होतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण हा मालवेअर कोड शोधून काढून टाकत नाही? ताेपर्यंत पुढेही हल्ला होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे सॉफ्टवेअर बदलणे किंवा आपल्या सरकारी यंत्रणांनी यासाठी चोख काम करणे गरजेचे आहे, असे डाॅ. माळी यांनी नमूद केले.

* ...तर देशभरातील वीजपुरवठा खंडित हाेण्याची शक्यता !

एका संस्थेकडे हल्ला होणार अशी माहिती होती किंवा त्यांनी तसा इशारा दिला होता तर दुसऱ्या संस्थेकडे तो हल्ला थोपविण्यासाठी जी उपाययोजना लागते, ती होती की नव्हती? असाही प्रश्न उपस्थित होतो. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे केवळ मुंबईच नाही तर देशभरातील शहरांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेला यासाठी नेमलेल्या संस्थांनी काम करणे गरजेचे असते. कारण त्यासाठी पैसे मोजण्यात आलेले असतात, असे डाॅ. माळी यांनी सांगितले.

.....................................

Web Title: The only solution is to change the software, including detecting and removing malware code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.