मुंबईतील एकमेव सूर्यमंदिर, ११८ वर्षे जुने मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 02:43 AM2018-01-07T02:43:03+5:302018-01-07T02:43:08+5:30
भारताबाहेर अनेक ठिकाणी सूर्याची मंदिरे आहेत. हजारो भाविक तेथे सूर्यपूजेसाठी येतात. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, तो १३व्या शतकात बांधलेल्या कोणार्क येथील सूर्यमंदिराचा.
- अक्षय चोरगे
भारताबाहेर अनेक ठिकाणी सूर्याची मंदिरे आहेत. हजारो भाविक तेथे सूर्यपूजेसाठी येतात. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, तो १३व्या शतकात बांधलेल्या कोणार्क येथील सूर्यमंदिराचा. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत या मंदिराचा समावेश करण्यात आला आहे. आठव्या शतकात जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथील मार्तंड सूर्यमंदिर, तसेच चीन, इजिप्त आणि पाकिस्तानमध्येही सूर्याची मंदिरे आहेत. महाराष्टÑात रत्नागिरी जिल्ह्यात परुळे येथेही सूर्यमंदिर आहे. असेच सूर्याचे एक मंदिर मुंबईतही आहे. भुलेश्वर येथील पांजरापोळमध्ये सूर्यदेवाचे मंदिर ११८ वर्षे जुने मंदिर आहे.
हरजीवन वसनजी मणीयार या गृहस्थांनी १८९९ साली दक्षिण मुंबईतील भुलेश्वरमध्ये सूर्यमंदिराची उभारणी केली. हरजीवन आणि
त्यांचे गुरू सूर्यदेवाचे भक्त होते.
गुरूने आदेश दिल्यामुळे हरजीवन यांनी हे मंदिर उभारले. मुंबईतल्या जुन्या आणि खूप कमी लोकांना
माहीत असलेल्या मंदिरांपैकी हे
एक मंंदिर आहे. सूर्यदेवाचे हे मुंबईतील एकमेव मंदिर असल्याचा दावा येथील पुजारी करतात.
एकाच मंदिरात दिवसातून तीन
वेळा ३६५ दिवस हवन केले
जाते, असे हे एकमेव मंदिर
असल्याचा दावाही पुजारी करतात. सध्या मंदिराचा संपूर्ण कारभार हरजीवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पाहिला जातो.
प्रफुलभाई वखारीया हे या ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. मंजिरीबेन गोरधनदास (अध्यक्षा), भरतभाई मर्चंट (विश्वस्त), विनूभाई मोदी (विश्वस्त) हे तिघेही
ट्रस्टचे कामकाज पाहतात, तसेच परीमल पुरोहित हे या मंदिराचे पुजारी आहेत. ३७ वर्षांपासून ते मंदिरात पुजारी म्हणून काम पाहत आहेत.
त्या अगोदर त्यांचे वडील २५ वर्षे
या मंदिराचे पुजारी होते. तब्बल
६२ वर्षे पुजारीपद पुरोहित
घरामध्ये आहे. त्यांच्या अगोदर नारायण जोशी हे या मंदिराचे पुजारी होते.
मंदिर बांधण्यासाठी हरजीवन यांनी गुजरातमधील पोरबंदर आणि राजस्थानमधील जयपूर येथून खडक मागविले होते, तसेच मंदिर बांधणारे कारागीरही जयपूरहून आले होते. हे मंदिर बांधायला तब्बल ४ वर्षे लागली. मंदिरात ४९ खांबांवर ४९ ऋषींच्या मूर्ती आहेत. सूर्यदेवाच्या रथापुढे ४९ हजार मारूत गण असतात. त्यांचे प्रतिनिधी म्हणून ४९ ऋषींच्या मूर्ती मंदिरात बसविण्यात आल्या आहेत. मंदिराच्या शिखरावर ८ दिशांमध्ये ब्रह्मा, विश्वकर्मा, काळभैरव, यमराज, इंद्रदेव, अग्निनारायण, शंकर आणि विष्णू या ८ दिशापतींच्या मूर्ती आहेत. मंदिराची उंची ५० फूट उंच आहे.
सूर्यपूजा कशी करतात?
दिवसातून तीन वेळा सूर्याकडे पाहत त्याला नमन करतात. पहाटे किंवा दिवसातून तीन वेळा सूर्याला अर्ध्य अर्पण केले जाते. सूर्यास्तापूर्वी जेवणे व सूर्यास्तानंतर जेवण न करणे. रविवारी उपवासही करतात किंवा फक्त दूध तांदळाची खीर खाल्ली जाते.
सूर्य हा ऊर्जेचा स्रोत
सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे. धार्मिक परंपरांमध्ये सूर्याला अर्ध्य अर्पण करणे, सूर्यनमस्कार घालणे, सूर्यदर्शन करणे या गोष्टींना महत्त्वाचे स्थान आहे. यात सूर्याची पूजादेखील केली जाते. नदीकिनारी, समुद्रकिनारी जाऊन लोक सूर्याची पूजा करतात. शक्य नसल्यास घर किंवा अंगणातच ही पूजा करतात.