Join us  

बँकेतील कॅशियरलाच भामट्याचा गंडा; एटीएम लंपास केल्याने पोलिसात धाव

By गौरी टेंबकर | Published: February 28, 2024 3:54 PM

युनियन बँक ऑफ इंडियाच्या कांदिवली पश्चिम शाखेत तक्रारदार अनिल चव्हाण (५५) हे कॅशियर म्हणून काम करतात

मुंबई: कांदिवली परिसरात एका नामांकित बँकेत काम करणाऱ्या बँकरला बोलण्यात गुंतवून त्याचे एटीएम कार्ड लंपास करण्यात आले. तसेच त्यातून काही रक्कम काढत खरेदी ही करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी कांदिवली पोलिसात तक्रार दिल्यावर दोन अनोळखी भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या कांदिवली पश्चिम शाखेत तक्रारदार अनिल चव्हाण (५५) हे कॅशियर म्हणून काम करतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार २७ फेब्रुवारी रोजी ते काम संपवून संध्याकाळी साडेचार च्या सुमारास बँकेतून दहिसर या ठिकाणी असलेल्या त्यांच्या घरी जायला निघाले. त्यांना वैयक्तिक कामासाठी पैसे हवे असल्याने जवळच असलेल्या एमटीएनएल बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन त्यांनी २० हजार रुपये काढायचा प्रयत्न केला. मात्र ते पैसे निघत नव्हते जे पाहून त्यांच्या मागे उभे असलेल्या ३० ते ४० वयोगटातील दोन इसमांनी त्यांना त्यांचा प्रॉब्लेम विचारला. ज्यावर एटीएम मधून पैसे निघत नसल्याचे त्यांनी त्यांना सांगितले आणि त्या दोघांनी त्यांच्या हातातून एटीएम कार्ड घेऊन पुन्हा ते मशीनमध्ये टाकत त्यांना पिन कोड दाबायला सांगितला. मात्र तरी देखील त्यांचे पैसे निघाले नाही त्यामुळे ते बाहेर आले आणि घरी जायला निघाले. घरी पोहोचणार इतक्यात त्यांना मोबाईलवर मेसेज आले ज्यात त्यांचा खात्यातून चार व्यवहारांमध्ये ४० हजार रुपये काढण्यात आले. इतकेच नव्हे तर १८ हजार रुपयांची खरेदी करत एकूण ५८ हजारांची फसवणूक झाल्याचेही त्यांना समजले. त्यांनी त्यांच्याकडे असलेले कार्ड तपासले तेव्हा ते त्यांचे एटीएम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना बोलण्यात गुंतवून सदर भामट्यांनी त्यांचे एटीएम कार्ड बदलले होते. अखेर याप्रकरणी तक्रार देण्यासाठी त्यांनी कांदिवली पोलिसात धाव घेतली.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई