MNS Raj thackeray ( Marathi News ) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) सरचिटणीस सीताराम येचुरी (७२) यांचे प्रदीर्घ आजारामुळे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी निधन झाले.फुप्फुसामध्ये संसर्ग झाल्याने येचुरी यांना एम्स रुग्णालयात होते. गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवल्यानंतर देशभरातील विविध नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही येचुरी यांच्या विचारधारेवरील निष्ठेवर भाष्य करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सीताराम येचुरी यांना श्रद्धांजली अर्पण करताना राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महासचिव सीताराम येचुरी यांचं निधन झालं. तसा येचुरी यांचा किंवा एकूणच कम्युनिस्ट पक्षाचा माझा तसा कधी सहवास आलेला नाही, पण एक विचारसरणी एकदा का स्वीकारली की तिच्याशी कुठलीही प्रतारणा न करता, शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावर श्रद्धा ठेवणारे भारतीय राजकारणात आता फक्त कम्युनिस्टच उरलेत असं म्हणावं लागेल, आणि याचंच मला खूप कौतुक आहे."
सीताराम येचुरी यांच्या योगदानाबद्दल पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातले तसे बऱ्यापैकी प्रगतिशील विचारांचे नेते. कम्युनिस्टांचा काँग्रेस विरोध कडवा. पण किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर काँग्रेसशी जुळवून घेण्यासाठी कम्युनिस्टांच मन वळवण्यात सीताराम येचुरी यांचा वाटा मोठा.'सत्ता' हाच किमान समान कार्यक्रम झालेला असताना, सैद्धांतिक विरोध बाजूला ठेवून, काही मूलभूत प्रश्नांवर एकत्र येणे हे आता दुर्मिळच झालं आहे. एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या खासदाराची राज्यसभेची मुदत संपताना, सभागृहातील सदस्यांनी भावनिक निरोप देणे, हे येचुरींच्या बाबतीत घडलं.विचारसरणीला घट्ट धरून राहण्याची परंपरा अस्तंगत होत असताना येचुरींसारख्या नेत्यांचं वेगळेपण जाणवत राहतं. सीताराम येचुरींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली," अशा शब्दांत राज ठाकरे यांनी येचुरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
"येचुरी प्रभावी संसदपटू राजकीय क्षेत्रात सर्वांशी माकप नेते सीताराम येचुरी उत्तम संबंध राखून होते. डाव्या पक्षांतील ते अग्रणी नेते होते. ते प्रभावी संसदपटू होते. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करत आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
येचुरी यांचा प्रवास
सीताराम येचुरी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेत काम केले होते. ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचेही सदस्य होते. १९८४ मध्ये ते माकपच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य झाले. येचुरी २००५ ते २०१७ या कालावधीत राज्यसभेचे खासदार होते. २०१५ मध्ये ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले.