'...तरच मुंबईतील आगीच्या घटनांचा धोका कमी होईल!'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 03:40 AM2020-02-24T03:40:50+5:302020-02-24T03:41:03+5:30
आगीचा धोका कमी करायचा असेल तर केवळ जनजागृती करून उपयोग नाही, तर अग्निसुरक्षेचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी
जवळपास दोन वर्षांपूर्वीच्या कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या घटनेनंतर मुंबई महापालिकेने सर्व इमारती, उपाहारगृह, आस्थापनांच्या झाडाझडतीची मोहीम हाती घेतली. आगप्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उपाहारगृहांना ‘आॅन दि स्पॉट’ टाळे लावण्याची भूमिका प्रशासनाने घेतली होती. यामुळे नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे, असे वाटत होते. मात्र आजही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे दिसते आहे. मुंबईतील सततच्या आगीच्या घटना पाहता हीच गोष्ट अधोरेखित होते. ‘हा आगीचा धोका कमी करायचा असेल तर केवळ जनजागृती करून उपयोग नाही, तर अग्निसुरक्षेचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, त्यासाठी अग्निशमन दलाकडे पुरेसे मनुष्यबळ हवे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईकरांनीही नियमांचे पालन करायला हवे.’ हा सल्ला दिला आहे, मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त प्रमुख अधिकारी प्रताप करगुप्पीकर यांनी. त्यांच्याशी शेफाली परब-पंडित यांनी साधलेला संवाद...
जनजागृतीनंतरही मुंबईत आगीच्या घटना कशामुळे वाढत आहेत?
अग्निशमन दलाकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यातच इमारतींची तपासणी आणि दुर्घटनेच्या वेळी मदतकार्य या दोन्हीची जबाबदारी अग्निशमन दलाच्या जवानांवर असते. या ताणामुळे तपासणी करून संबंधितांना नोटीस पाठवणे, एफआयआर दाखल करण्याचे सोपस्कार केले जातात. मात्र अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणाºयांवर कठोर कारवाई होत नाही. या प्रकरणांचे पुढे काय झाले? याचा पाठपुरावा करणे मनुष्यबळाअभावी शक्य नसते. कडक शिक्षा होत नसल्याने पुन्हा त्याच चुकांची पुनरावृत्ती होत राहते. त्यामुळे लोकांवर वचक बसत नाही, तोपर्यंत अशा दुर्घटनांचा धोका कायम आहे.
अशा घटना टाळण्यासाठी कोणते प्रतिबंधक उपाय करायला हवेत?
आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने तपासणी कक्ष स्थापन केला. मात्र या कक्षाची जबाबदारीही त्याच जवानांकडे दिली. दुर्घटनेच्या वेळी मदतकार्यास जाणारे जवान तपासणीच्या कामातही व्यस्त झाले. या दोन कामांचा ताण अग्निशमन दलाच्या जवानांवर पडत आहे. त्यामुळे स्वतंत्र तपासणी कक्ष, त्यात नवीन कर्मचारीवर्ग नियुक्त करण्याची गरज आहे. त्यांच्यावर केवळ मुंबईतील सर्व इमारतींची तपासणी करणे, संबंधितांना नोटीस देणे, एफआयआर दाखल करणे, नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कठोर कारवाई होण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा करणे. याकरता सक्षम वकिलांची फौज तयार ठेवणे, अशी जबाबदारी असावी. तपासणी कक्षामार्फत नियमित झाडाझडती घेऊन या प्रकरणांचा पाठपुरावा केल्यास आगीच्या घटना कमी होऊ शकतील.
अग्निशमन दलाच्या निधीत कपात करण्यात आली आहे. यावर तुमचे मत काय?
अग्निशमन दलाचे सक्षमीकरण आवश्यक आहे. मात्र अर्थसंकल्पात तेवढे महत्त्व दिले जात नसेल तर हे दुर्दैवी आहे. अग्निशमन दलाला सक्षम करण्याची गरज आहे. पण येणारे प्रत्येक आयुक्त नवीन प्रयोग करीत राहतात. अग्निशमन दलामध्ये १९९१मध्ये बदल करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा सुधारणा होण्याची गरज आहे. अधिकारांमध्ये वाढ व्हावी. सक्षम वकिलांची फौज द्या, असा प्रस्ताव मी प्रमुखपदाच्या कार्यकाळात ठेवला होता. मात्र त्यावर काहीच झाले नाही.
रासायनिक कंपन्या मुंबईतून हद्दपार करण्याची मागणी होत होती. त्याची गरज वाटते का?
राज्यात २२ औद्योगिक वसाहती आहेत. मात्र त्यांच्याकडे आवश्यक मनुष्यबळ व साधन नाही. रासायनिक कारखान्यांची नियमित नोंद केली जात नाही. त्यांना खबरदारी घेण्यासाठी भाग पाडल्यास अग्निशमन दलावरील ताण थोडा कमी होईल. बºयाच वेळा निष्काळजीमुळे अशा कारखान्यांमध्ये आगीचा भडका उडतो. भिवंडीमध्ये गोदामात आग लागली की, ती जळून खाक होतात. पण आग विझविण्यात यश येत नाही. एमआयडीसीमधील अग्निशमन यंत्रणा सक्षम करून नियमित तपासणी झाल्यास आगीचा धोका टळेल.
अग्निशमन दलाच्या रिस्पॉन्स टाइमवर नाराजी व्यक्त होते. खरेच जवान कमी पडतात का?
१९७०मध्ये आग विझविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी तीन मिनिटांमध्ये पोहोचत होते. मात्र आता तीन ते २५ मिनिटे असा कालावधी लागतो. मुंबईतील वाहतूककोंडी हे या विलंबाचे प्रमुख कारण आहे. त्यानंतर टोलेजंग इमारतींमधील वाहनांचे पार्किंग ही दुसरी समस्या. मोठ्या इमारतींमधील ड्युप्लेक्स व ट्रीपलेक्स फ्लॅट डोकेदुखीचे ठरत आहेत. मात्र दोष अग्निशमन दलाला देण्यात येतो. ग्लास फसाड (काचेच्या) इमारतींचा धोका लक्षात आल्यानंतरही अद्याप त्यावर नियंत्रण आणण्यात पालिकेला यश आलेले नाही. अग्निशमन दलातील पूर्वीच्या शिड्या २४ मीटरपर्यंत होत्या. आता ७० मीटरपर्यंत त्या पोहोचल्या, मात्र त्या जड असल्यामुळे वाहतूककोंडीतून बाहेर पडण्यास समस्या येते. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. केवळ अग्निशमन दलावरच विसंबून न राहता प्रत्येक विभागातल्या सहायक आयुक्तांनी सतर्क राहणे, इमारतींची नियमित तपासणी करून कारवाईसाठी पावले उचलणे अपेक्षित आहे.
मुंबईकरांनी कोणती काळजी घ्यावी?
आपत्ती काळात इमारतीमधील बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा ठेवावा, मीटर बॉक्स बंद असावा, अग्निरोधक यंत्रणा नियमित तपासून कार्यान्वित ठेवावी, इमारतीच्या आवारातील पार्किंग सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजनबद्ध असावी. आपण व आपले कुटुंब सुरक्षित राहावे यासाठी खबरदारी घेण्याची जबाबदारी आपली आहे, हे ओळखून लोकांनी नियम पाळावेत. तरच आगीचा धोका कमी होईल.