...तरच मुंबर्ई आगीपासून वाचेल!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 06:34 AM2018-06-14T06:34:33+5:302018-06-14T06:34:33+5:30

मुंबई अग्निशमन दलाकडे इमारतीला लागलेली आग शमविण्यासाठी २७ मजल्यांपर्यंत जाईल एवढी मोठी नव्वद मीटर उंच शिडी आहे. कोणत्याही मोठ्या इमारतीला लागलेली आग बाहेरून नाही, तर आतून शमविली जाते.

Only then will the fire escape from fire! | ...तरच मुंबर्ई आगीपासून वाचेल!  

...तरच मुंबर्ई आगीपासून वाचेल!  

Next

मुंबई - मुंबई अग्निशमन दलाकडे इमारतीला लागलेली आग शमविण्यासाठी २७ मजल्यांपर्यंत जाईल एवढी मोठी नव्वद मीटर उंच शिडी आहे. कोणत्याही मोठ्या इमारतीला लागलेली आग बाहेरून नाही, तर आतून शमविली जाते. मोठ्या इमारतीची आग विझविताना इमारतीमधील अग्निशमन यंत्रणांची प्रामुख्याने मदत होते. परिणामी, कोणत्याही परिस्थितीमध्ये उंच इमारतींमधील अग्निशमन यंत्रणांची देखभाल-दुरुस्ती महत्त्वाची असून, वर्षातून दोनदा अग्निशमन यंत्रणांची देखभाल-दुरुस्ती केली तर याच यंत्रणा मुंबईला आगीपासून वाचवू शकतात, असे मत अग्निप्रतिबंधक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
प्रभादेवी येथील आप्पासाहेब मराठे मार्गावरील तळमजला अधिक ३३ मजली ब्यू मॉन्ड या इमारतीच्या ३३व्या मजल्यावर बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आग लागली. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे काम हाती घेत इमारतीतील तब्बल ९० ते ९५ जणांची सुखरूप सुटका केली. ही आग सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पूर्णत: शमली, असे अग्निशमन दलाने सांगितले. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर याकडे लक्ष वेधले असता; मुंबई शहर आणि उपनगरातील इमारतींमध्ये फायर हॉस हिल्स, फायर हायड्रेंट सिस्टिम, आॅटोमॅटीक स्प्रिंक्लर सिस्टिम असणे गरजेचे आहे. नुसते असणे महत्त्वाचे नाही, तर या यंत्रणा कार्यान्वित आहेत ना याचीही तपासणी होणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

आगीच्या वाढत्या दुर्घटनांनी मुंबईकरांना अग्निसंकटाची जाणीव करून दिली आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या मर्यादित ताफ्यापुढे अनेक आव्हाने आहेत. त्यामुळेच अग्निसंकटाचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी, आता अग्निशमन दलातर्फे मुंबईतील सर्व इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांची खातरजमा करण्यासाठी, अग्निशमन केंद्रनिहाय ३४ ‘अग्निसुरक्षा पालन कक्ष’ कार्यान्वित केले आहेत. प्रत्येक कक्षात मुंबई अग्निशमन दलातील अनुभवी अधिकाऱ्यांची ‘नामनिर्देशित अधिकारी’ (अग्निसुरक्षा पालन अधिकारी) या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अग्निशमन दलाने दक्ष राहणे महत्त्वाचे नाही, तर मुंबईकरांनीही दक्ष राहणे गरजेचे आहे.

वर्षभरात घडलेल्या आगीच्या काही महत्त्वाच्या घटना...

साकीनाका येथील फरसाण मार्टला लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला.
अंधेरी येथे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.
कमला मिल कम्पाउंडमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला.
कांजूरमार्ग येथील स्टुडिओला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला.
सप्टेंबरमध्ये विलेपार्ले येथील जुहू प्रार्थना येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला आग लागली. आगीत २४ जण जखमी झाले. त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला.
अंधेरी येथील सवेरा इमारतीमध्ये अतिवृष्टीमुळे पाणी साचून, त्यात विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येऊन एकाचा मृत्यू झाला.
मुंबई शहर आणि उपनगरात सप्टेंबर आणि आॅक्टोबर २०१७मध्ये १ हजार २६९ दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांत ६२ जण जखमी, तर १९ जणांचा मृत्यू झाला.
काळबादेवी येथील आगीच्या घटनेनंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने, तीन वर्षांत मुंबई अग्निशमन दलातील सहा प्रकारांच्या उपकरणांसाठी
तब्बल ५९ कोटी रुपये खर्च केले आहेत.
महापालिका आणि अग्निशमन दलाने जेवढे सज्ज राहणे गरजेचे आहे; तेवढेच येथील सोसायटी आणि व्यावसायिक इमारतींनी सज्ज असणे गरजेचे आहे. मात्र याबाबत उदासीनता बाळगण्यात येत असल्याचे अग्निशमन विभागाने केलेल्या कारवाईतून समोर आले होते.
नुकतेच सुमारे चार हजार इमारतींत अग्निशमन यंत्रणा निकामी असल्याचे निदर्शनास आले आहे.
आगीच्या घटना घडल्यास गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा असल्यास आग विझविणे सोपे जाते. परंतु अशा यंत्रणा बसविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे नादुरुस्त आणि कालबाह्य झालेल्या यंत्रणा दुरुस्त केल्या जात नाहीत; अथवा बदलण्यात येत नाहीत. परिणामी, समस्या उग्र रूप धारण करते.
प्राथमिक अग्निसुरक्षेसाठी आपण आपले ज्ञान अद्ययावत करणे आवश्यक आहे. शासनाने जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाय योजना नियम २००८ लागू करून जनतेला अग्निशमनाबाबत कायद्याचे पाठबळ दिले आहे. यामुळे ‘राष्ट्रीय बांधकाम संहिता’ ही मार्गदर्शिका पुस्तिका सर्वांना बंधनकारक आहे.
बांधकामाधीन इमारती वापरात आल्यानंतर सर्व यंत्रणेची देखभाल आणि निगा तसेच वापराबद्दलची माहिती आपण करून घेणे आवश्यक असते. मात्र देखभाल खर्च, धकाधकीचे जीवन, अपुरे ज्ञान, अपुरी इच्छाशक्ती यामुळे ही सर्व यंत्रणा तोकडी पडते.
उंच इमारतीत वर्षातून दोनदा तरी निकासन सराव आवश्यक असतो.
मुंबई शहरात ज्या इमारतींना मालमत्ता कर लागू होतो; अशा २ लाखांहून अधिक इमारती आहेत. २ लाख इमारतींमध्ये सुमारे २५ हजार इमारती या सात मजल्यांहून अधिक मजल्यांच्या आहेत; या २५ हजार इमारतींमध्ये अग्निशमनाचे नियम पाळले जात नाहीत.

Web Title: Only then will the fire escape from fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.