मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण ठरला आहे. त्यामुळेच, अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीवर सातत्याने प्रश्नांना सामोरे जावे लागते. अर्थात, यासंदर्भात मी मला जेव्हा वाटेल तेव्हा सविस्तर बोलेन, असेही पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, पत्रकारांकडून राहून राहून त्यासंदर्भात अजित पवारांना प्रश्न केले जातात. आता, पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवर अजित पवार स्पष्टच बोलले आहेत. आत्मचरित्र लिहिन तेव्हा सगळं खरं खरं लिहीन, असे पवार यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबद्दल गौप्यस्फोट केला होता. या शपथविधीची माहिती शरद पवारांना होती, असे ते म्हणाले. त्यानंतर, पुन्हा एकदा भाजप-राष्ट्रवादी युतीची चर्चा राज्यात रंगली होती. मात्र, फडणवीसांचे ते विधान असत्य असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. आता, अजित पवार यांना पुन्हा एकदा एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मी याबाबत आत्ताच बोलणार नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा, आत्ता हा शब्द निघून जाईल आणि मी बोलेन असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच, ज्यावेळी मला वाटेल आत्मचरित्र लिहावं, त्यावेळी मी लिहीन. आत्मचरित्रात सगळ्या गोष्टी लिहिन. सुरुवातीपासूनच सगळं लिहीन, ते वाचल्यावर कुणाला काय वाटेल, ते वाटेल पण मी सगळं खरं खरं लिहिन. मला त्याची किंमत मोजावी लागली तरी मी ते लिहीन, खरं सांगेन असे अजित पवार यांनी म्हटले.
फडणवीसांचा गौप्यस्फोट, अजित पवाराचं मौन
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त ठरलेल्या २०१९ साली घडलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार शपथविधीसाठी आले होते, असा खुलासा त्यांनी केला. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली, “मी कोणाशी बोलायचे तो माझा अधिकार”, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथील कार्यक्रमासाठी आले होते. येथे त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली होती.