लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड १९ चा संसर्ग राेखण्यासाठी फक्त आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी काेराेनाच्या सर्व निकषांचे पालन करणे बंधनकारक आहे.
मध्य रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, अतिरिक्त गाड्यांची घोषणा करणे हे रेल्वे सेवांना हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा एक भाग आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, काेराेनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत रेल्वेच्या अतिरिक्त सेवा आणि बुकिंग संदर्भात पॅनिक बुकिंग असा तर्क काढणे टाळावे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेतर्फे उन्हाळ्यात जास्त गाड्या चालवल्या जातात.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, बहुतांश मुंबईकर गावी जाण्याच्या विचारात आहेत. स्थलांतरित कामगारही पुन्हा आपल्या गावी जात असून, कुर्ला टर्मिनससह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल येथे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होत आहे. गर्दीचे नियाेजन करण्यात येत असून, प्रवाशांनी गर्दी करू नये, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले.
..................