दोन डोस घेतलेल्यांनाच विसर्जनस्थळी जाता येणार; मुंबईत गणेशोत्सव नियमावली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 08:37 AM2021-08-24T08:37:05+5:302021-08-24T08:37:17+5:30
Ganeshotsav: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी गणेशमूर्तीच्या विसर्जनाला परवानगी देण्यात आलेली नव्हती. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्ती पालिकेच्या पथकाकडे देणे बंधनकारक करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आल्याने यंदाच्या गणेशोत्सवातही कोरोना नियमावली कायम ठेवण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मागणी मान्य करीत लसीचे दोन डोस घेतलेल्या १० कार्यकर्त्यांना विसर्जनस्थळी जाण्याची परवानगी मुंबई पालिका प्रशासनाने दिली आहे. प्रत्यक्ष गणेश विसर्जन पालिकेच्या पथकाकडून करण्यात येईल. विसर्जन मिरवणुकही काढता येणार नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी गणेशमूर्तीच्या विसर्जनाला परवानगी देण्यात आलेली नव्हती. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्ती पालिकेच्या पथकाकडे देणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. त्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्या सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांना चौपाट्यांवर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी समन्वय समितीने केली होती. याबाबत समन्वय समिती आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आली आहे. या बैठकीत पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे आणि समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर हे उपस्थित होते.
गणेश दर्शनाबाबत सरकार निर्णय घेणार
सार्वजनिक मंडळांच्या गणेश दर्शनासाठी भाविकांना मंडपात दर्शन किंवा मुखदर्शन घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने या बैठकीत केली. मात्र यासंदर्भातील निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. तर रस्त्यांवरील खड्डे युद्धपातळीवर बुजविण्यात येतील, असे आश्वासन पालिकेने या वेळी दिले.
गणेशोत्सवासाठी
पुढील सूचना...
nसार्वजनिक गणेशोत्सव मूर्ती चार फूट, घरगुती गणेशमूर्ती दोन फूट उंच असावी.
nगर्दी होणार नाही, याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी.
nविसर्जन ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती द्यावी लागेल.
nलहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनाला जाऊ नये.
nमोठ्या गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सोय करावी.