अवघ्या तीन वर्षांच्या आराध्याची मृत्यूशी झुंज
By admin | Published: February 18, 2017 06:50 AM2017-02-18T06:50:42+5:302017-02-18T06:50:42+5:30
अवघ्या तीन वर्षांच्या आराध्याला डायलेटेड कार्डिओमिपथी हा गंभीर आजार झाला आहे. केवळ १३ किलो वजनाच्या या
मुंबई : अवघ्या तीन वर्षांच्या आराध्याला डायलेटेड कार्डिओमिपथी हा गंभीर आजार झाला आहे. केवळ १३ किलो वजनाच्या या मुलीचे हृदय सध्या फक्त १०-१५ टक्के पंपिंग करत आहे, सामान्यत: ही मर्यादा ५५-६४ टक्के असते. सध्या या चिमुकलीवर मुलुंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, गेल्या जवळपास १० महिन्यांपासून ती हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहे.
आराध्याला दर आठवड्याला दोन दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागते. गेल्या काही आठवड्यांपासून आराध्याची तब्येत खालावली असून, ती मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे तिला तातडीने हृदय मिळावे, हा संदेश पोहोचविण्यासाठी रुग्णालय प्रशासन आणि तिचे कुटुंबीय वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. राज्यातील अवयव प्रत्यारोपण यादीतील सर्वांत लहान रुग्ण असलेल्या आराध्याला ४० किलो वजनापेक्षा कमी वजन असणाऱ्या ‘ए’ किंवा ‘ओ’ रक्तगटाच्या ‘ब्रेनडेड’ व्यक्तीमुळे नवसंजीवनी मिळू शकते.
सध्या पिडिएट्रिक कार्डिएक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. विजय अग्रवाल यांच्या देखरेखीखाली आराध्यावर उपचार सुरू आहेत. मूळची नवी मुंबईची असणाऱ्या आराध्याच्या वडिलांचा छोटेखानी उद्योग आहे, तर आई गृहिणी आहे. आराध्याला हृदय मिळावे, यासाठी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची धडपड तिचे पालक करीत आहेत. (प्रतिनिधी)
आराध्याच्या हृदयाच्या आकार फुग्यासारखा वाढतो, मात्र त्याची पंपिंग क्षमता खूप कमी आहे. सध्या औषधोपचारांच्या साहाय्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. कृत्रिम हृदय या पर्यायाचा विचार आराध्यासाठी करता येत नाही; कारण त्यासाठी रुग्णाचे वजन किमान १६ ते १७ किलो असणे अपेक्षित आहे. मात्र आराध्याचे वजन केवळ १३ किलो आहे.
- डॉ. विजय अग्रवाल
जनजागरूकतेचा अभाव
च्अवयव प्रत्यारोपणासाठी देशभरातील कोणत्याही ‘ब्रेनडेड’ वा अपघात झालेल्या रुग्णाचा विचार केला जातो. यासाठी अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीतील संख्या मोठी आहे. राज्यात सुमारे हजार लहानग्यांना डायलेटेड कार्डिओमिपथीचा आजार आहे.
च्मात्र, देशभरात अवयव प्रत्यारोपणाविषयी जनजागरूकतेचा अभाव असल्याने अपघात, ब्रेनडेड प्रकरणांमध्ये कुटुंबीय यासाठी पाऊल पुढे टाकत नाहीत. त्यांना अवयव प्रत्यारोपणाचे महत्त्व आणि गरज माहीत नसते, अशी खंत डॉक्टरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. त्यामुळे सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी तळागाळात जाऊन अवयव प्रत्यारोपणाविषयी जागरूकता निर्माण केली पाहिजे.