जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे केवळ दौरे सुरू असून उत्तर महाराष्ट्रासह इतर ठिकाणच्या दुष्काळी स्थितीकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आज शेतकऱ्यांसह सर्वच जण हवालदिल झाले आहेत, असा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी जळगावात केला. सिंचन प्रकल्पांनादेखील एक दमडीही देण्याची तयारी या सरकारची नसल्याने कामे खोळंबली असल्याचेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील सात मंत्र्यांचा समावेश झाल्यानंतर जळगाव जिल्हा भाजपच्यावतीने या मंत्र्यांचा दिल्ली येथे जाऊन सत्कार करण्यात आला. त्या विषयी माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्या वेळी गिरीश महाजन बोलत होते.
पूरस्थिती व दुष्काळी स्थितीकडेही दुर्लक्ष
राज्यात एकीकडे अतिपाऊस होत आहे तर काही ठिकाणी पाऊस नाही. या दोन्ही स्थितीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असून उपाययोजना करण्यात ते अपयशी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. केवळ दौरे करून खाणे-पिणे सुरू असल्याचाही टोला त्यांनी लगावला.
गांधीजींचे तीन माकड
सरकारमधील तिन्ही पक्षांचा समन्वय नसल्याने एक मंत्री काही सांगतो तर मुख्यमंत्री काही सांगतात. तिघांचे लक्ष नसून गांधीजींचे तीन माकड असल्यासारखी स्थिती झाली असल्याचेही महाजन म्हणाले.
मुंबई महापालिका स्वबळावर-
मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे महाजन यांनी या वेळी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली असली तरी त्यातून काय ठरते, हे पुढे बघू असे सांगत सध्यातरी मुंबई महापालिका स्वळावर लढणार असल्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.