Join us

यात्रेनंतर उरला फक्त कचरा

By admin | Published: November 20, 2014 11:16 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या भारत स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद सर्वच स्तरातून मिळत आहे.

अमोल पाटील, खालापूरपंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या भारत स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद सर्वच स्तरातून मिळत आहे. रायगडमध्ये ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुढाकाराने श्री दासभक्तांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला असताना सामान्य जनता मात्र स्वच्छता अभियानाला योग्य त्या गांभीर्याने घेत नसल्याचेच दिसून येत आहे. सध्या जत्रांचे दिवस असताना नागरिक जत्रांत वाट्टेल तसा कचरा टाकून स्वच्छतेचे तीनतेरा वाजवत आहेत. असाच प्रकार घडून आला तो साजगावच्या बोंबल्या विठोबाच्या यात्रेत.राज्यातील सुप्रसिद्ध अशा बोंंबल्या विठोबा साजगावची यात्रा अखेर बुधवारी संपली. सुक्या मासळीसह खाऊचे पदार्थ आणि मनोरंजनाच्या खेळातून करोडो रुपयांची उलाढाल या यात्रेच्या माध्यमातून झाली आहे. नागरिक यात्रेला आले, विठूरायाचे दर्शनही भक्तांनी घेतले, मात्र मागे ठेवून गेले निव्वळ कचरा. विठोबा मंदिराच्या भव्य पटांगणावर पंधरा दिवस यात्रा असल्याने संपूर्ण मैदान कचऱ्याने भरून गेले आहे आणि डास नि माश्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य याने धोक्यात आले आहे . धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साजगाव विठ्ठल मंदिराच्या भव्य मैदानावर कार्तिकी एकादशी निमित्ताने सलग पंधरा दिवस यात्रा भरली होती. संपूर्ण राज्यातून भाविक आणि ग्राहकांनी विठूरायाच्या दर्शनासाठी आणि खरेदीसाठी गर्दी केली होती. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सुकी मासळी बाजार आणि खाऊचे मार्केट. यासोबतच बैलबाजार आणि मनोरंजनासाठी आकाश पाळणे, लोकनाट्य, तमाशा अशा विविध कार्यक्रमांचे आकर्षण ही यात्रा असल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी येथे करोडो रुपयांची उलाढाल झाली. दरम्यान, यात्रेच्या दिवसात दोनदा मुसळधार पाऊस पडल्याने यात्रेत सर्वत्र चिखल झाला. स्थानिक नगर पालिकेच्या ताब्यात यात्रेचे नियोजन असून, पालिकेच्या आरोग्य विभागाकडे साफसफाईचे काम असते.