Join us  

विठ्ठलवाडीत लोकल न थांबताच दोन डबे पुढे!

By admin | Published: April 14, 2016 1:27 AM

कर्जतच्या दिशेने धावणारी लोकल विठ्ठलवाडी स्थानकातील फलाट क्रमांक-१ वर न थांबताच दोन डबे पुढे जाऊन थांबली. ही घटना मंगळवारी रात्री ९.१५ च्या सुमारास घडली. प्रवाशांच्या

डोंबिवली : कर्जतच्या दिशेने धावणारी लोकल विठ्ठलवाडी स्थानकातील फलाट क्रमांक-१ वर न थांबताच दोन डबे पुढे जाऊन थांबली. ही घटना मंगळवारी रात्री ९.१५ च्या सुमारास घडली. प्रवाशांच्या आरडाओरडीमुळे मोठा अनर्थ टळला. मोटारमनने मात्र त्यानंतर तातडीने गाडी थांबवत लोकल पुन्हा मागे घेतली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. काही प्रवासी घाबरलेही होते. काही काळ स्थानकात तणावाचे वातावरण होते. नेमकी ही घटना कशामुळे घडली, याबाबतची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. घटनास्थळी अंबरनाथ, कल्याण स्थानकांतील रेल्वे पोलीस दलाचे पोलीस पोहोचले होते, अशी माहिती लोहमार्ग पोलीस सूत्रांनी दिली. सिग्नल यंत्रणा फेल झाल्याने की मोटारमनच्या दुर्लक्षामुळे, या शक्यतांसह अन्य काही तांत्रिक दोषांमुळे ही घटना घडली का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. सुरक्षा विभागाने मात्र या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठांना माहिती दिल्याचे सांगण्यात आले. कर्जत लोकलच्या घटनेत अनेक शासकीय-निमशासकीय कर्मचारी होते. त्यांनी हे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली. लोहमार्ग पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असला तरीही आरपीएफ विभागाच्या अंतर्गत हे प्रकरण येत असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर मात्र याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. घटनेनंतर काही काळात लोकल मागे घेण्यात आली व अल्पावधीत ती कर्जतच्या दिशेने धावल्याचेही सांगण्यात आले.या संदर्भात माहिती घ्यावी लागेल, अशी घटना घडली का? घडली तर ती कशामुळे, हे त्याशिवाय सांगता येणार नाही.- नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे