नागपूर - टीडीआर, एफएसआयचे हिशोब हे उद्धव ठाकरेंनाच चांगले कळतात. भाजपा कधी असे हिशोब करत नाही. उद्धव ठाकरेंना त्याचा अभ्यास आहे, असा टोला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तसेच अदानी भेटले नाहीत ते भेटण्यासाठी उद्धव ठाकरेंची ही केविलवाणी धडपड सुरू असून अदानींनी त्यांना महत्व दिल्याचे वाटत नसल्याची टिकाही दरेकरांनी केली.
आज नागपूर येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत दरेकर म्हणाले की, शरद पवारांचे बूट चाटणाऱ्यांनी सर्वप्रथम अदानींच्या विरोधात मोर्चा काढला त्याची परवानगी घेतली होती का? याचा खुलासा त्यांनी करावा. एकीकडे पवारांचे बूट चाटायचे, अदानी आणि पवारांचे संबंध माहित आहेत आणि दुसऱ्या बाजूला मोर्चा काढायचा ही दुटप्पी भुमिका आहे.
दरेकर पुढे म्हणाले की, काँग्रेसचे झारखंडचे खासदार धीरज साहू आहेत त्यांच्या घरात कोट्यावधीची कॅश सापडली त्यावर उद्धव ठाकरे यांचे तोंड बंद का? असा सवाल करत ते म्हणाले की, एका बाजूला देवेंद्र फडणवीस, भाजपाच्या नावाने ठणठणाट करायचा आणि एवढी मोठी रक्कम सापडल्यावर तो काँग्रेसचा खासदार आहे, काँग्रेसची चाटूगिरी करायची, काँग्रेस सोबत साटेलोटे आहे, भविष्यात लढायचे आहे म्हणून किती चापलुसी करणार. त्यामुळे अशा प्रकारच्या मोर्चाच्या माध्यमातूनची भुमिका लोकांना माहित आहे. तुमची भ्रष्टाचारविरोधी भुमिका किती तकलादू आहे हे दिसून येते. त्यामुळे नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही.
दरेकर पुढे म्हणाले की, धारावीची लोकं आज नरक यातना भोगत आहेत. त्यांनी आयुष्यात घराचे स्वप्न उराशी बाळगले होते ते पूर्ण होताना दिसतेय त्यात उद्धव ठाकरे जर मिठाचा खडा टाकणार असतील तर पापाचे धनी ते होतील. आपण ३० वर्ष राज्य करताय. हाकेच्या अंतरावर धारावी आहे. धारावीला काही सोईसुविधा देऊ शकला नाहीत. त्यामुळे आता केवळ नौटंकी करायची आणि आपले अस्तित्व दाखविण्याची केविलवाणी धडपड उद्धव ठाकरे करताना दिसत असल्याचा टोलाही दरेकर यांनी लगावला.
तसेच उद्धव ठाकरे काय आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. भाजपाला जुगार पार्टी बोलणे हे कुणालाही पटणार नाही. उद्धव ठाकरे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडू नयेत. कारण भाजपा हा पक्ष सुसंस्कृत पक्ष आहे. चुकीचे घडल्यावर काय करतात हे नवाब मालिकांच्या प्रकरणावरून दाखवून दिले आहे. त्यामुळे जुगार पार्टी बोलने हे उद्धव ठाकरेंच्या पोटात देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जी मळमळ सुरू असते, जो द्वेष असतो त्यातील एक उलटी असल्याची टिकाही दरेकर यांनी केली.
गिरणी कामगार आणि पोलिसांच्या पाठीशी हे सरकार भक्कमपणे उभेअडीच वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होते. गिरणी कामगार, पोलिसांविषयी काय आस्था होती हे त्यांनाही माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या घरांविषयी घेतलेली भुमिका सर्वश्रुत आहे. गिरणी कामगार, पोलीस यांच्या घरांबाबत महायुतीचे सरकार संवेदनशील आहे. आता एकेका वर्गाला आपलेसे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गिरणी कामगार आणि पोलिसांच्या पाठीशी हे सरकार भक्कम उभे आहे, असेही दरेकर यांनी म्हटले.