खड्ड्यांसाठी एकच संकेतस्थळ
By admin | Published: August 7, 2015 01:05 AM2015-08-07T01:05:49+5:302015-08-07T01:05:49+5:30
रस्त्यावरील खड्डे मुंबईकरांसाठी नवीन नाहीत. या खड्ड्यांवरून बभ्रा झाला की रस्ता आमचा नाहीच, अशी सोयीस्कर भूमिकाही मुंबईकरांच्या अंगवळणी
मुंबई : रस्त्यावरील खड्डे मुंबईकरांसाठी नवीन नाहीत. या खड्ड्यांवरून बभ्रा झाला की रस्ता आमचा नाहीच, अशी सोयीस्कर भूमिकाही मुंबईकरांच्या अंगवळणी पडलेली. त्यामुळे खड्डे दुरुस्तीसाठी तक्रार तरी कोठे करायची, हा प्रश्न नेहमीच नागरिकांना भेडसावत असतो. नागरिकांच्या या समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश थेट उच्च न्यायालयाने दिल्यानंतर नगरविकास विभागाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआर) क्षेत्रातील सर्वच यंत्रणांना तक्रार निवारणासाठी एकीकृत प्रणाली राबविण्याचे आदेश दिले आहेत.
एमएमआर क्षेत्रात मुंबई महापालिका, एमएमआरडीए, बीपीडी, पीडब्लूडी, एमआयडीसी, म्हाडा आणि संबंधित महापालिकांचे रस्ते आहेत. रस्त्यांच्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी एककेंद्रित तक्रार केंद्र कार्यान्वित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार राज्यातील रस्त्यांसाठी समान यांत्रिक पद्धत तयार करण्याबाबत नगरविकास विभागाने सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेने पावसाळ्यात खड्डे दुरुस्तीसाठी ६६६.५ङ्म्रूीङ्माू्र३्र९ील्ल.ूङ्मे हे संकेतस्थळ विकसित केले. यापुढे अन्य प्राधिकरणांच्या रस्त्यावरील खड्ड्यांसाठी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदविता येणार आहे. तसेच ही सुविधा केवळ पावसाळ्यात नव्हे तर वर्षभर उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी महापालिकेने अन्य सर्व प्राधिकरणांना आवश्यक आयडी व पासवर्ड द्यावेत, अशी सूचना नगरविकास विभागाने केली आहे. या संकेतस्थळावरील तक्रारींची संबंधित प्राधिकरणांनी तत्काळ दखल घेत कारवाई करावी, असे नगरविकास विभागाने म्हटले आहे.
या संकेतस्थळासोबत मुंबई महापालिकेच्या १२९२ व १२९३ या टोल फ्री क्रमांकावरही तक्रार नोंदविता येतील.
महापालिकेचे संकेतस्थळ व टोल फ्री क्रमांकावर ज्याप्रमाणे अन्य प्राधिकरणांच्या तक्रारी स्वीकारता येतील तसेच एमएमआरडीए व अन्य महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या तक्रारीसाठी संबंधित महापालिकांकडे असलेले संकेतस्थळ व टोल फ्री क्रमांकावरही तक्रारी स्वीकारण्यात याव्यात. या प्रणालीचा वापर करता यावा यासाठी लॉगिन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून द्यावेत. तसेच रस्त्यांबाबतच्या तक्रारी त्या त्या प्राधिकरणाकडे हस्तांतरित कराव्यात व त्या त्या प्राधिकरणाने तक्रारींवरील पुढील कार्यवाहीबाबतचा अहवाल तसेच दुरुस्त केलेल्या रस्त्यांच्या छायाचित्रासह महापालिकांच्या संगणकीय प्रणालीवर अपलोड करावेत, अशा सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहेत.
या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी व त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा, असेही नगरविकास विभागाने कळविले आहे. (प्रतिनिधी)