मुंबई : मुंबईतील महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज, शुक्रवारी (दि.१७) मुंबईतील सर्व २२७ निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयं आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येऊन (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेच्यावतीने आज सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा या वेळेत लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.
यासंदर्भातील ट्विट मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी मुंबईतील शासकीय व महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये केवळ महिलांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात येईल. तसेच, या लसीकरण केंद्रांवर सकाळी १०:३० - संध्याकाळी ६:३० या वेळेत महिला थेट जाऊन लस घेऊ शकतात. ऑनलाईन नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे, असे ट्विट करण्यात आले आहे.
दरम्यान, कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र आज सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत राबवले जाणार आहे. पहिली किंवा दुसरी मात्रा देखील या सत्रात दिली जाणार आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्यामुळे आजची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.
कोरोना रुग्णसंख्येत होतेय वाढमुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र काही दिवसांपासून वाढलेली आकडेवारी चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 431 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,13,605 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.