Join us

मोठी बातमी; बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 8:39 AM

या बांधकामाच्या वेळीच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे 90 हजारांहून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बांधकामादरम्यान 90 हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. 1 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीच्या  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने ही  घोषणा (NHSRCL) केली आहे. या बांधकामाच्या वेळीच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे 90 हजारांहून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.51 हजारांपेक्षा जास्त तंत्रज्ञ, कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता असल्याची माहिती महामंडळाच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी निवेदनात दिली आहे. बांधकामासाठी 51हजारांहून अधिक तंत्रज्ञ आणि कुशल व अकुशल कामगारांची आवश्यकता असेल. अशा लोकांना विविध संबंधित कामांसाठी प्रशिक्षण देणार आहे. ट्रॅक लावण्यासाठी, कंत्राटदारांच्या कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही कॉर्पोरेशन करेल.तसेच 34 हजारांपेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीबांधकाम सुरू असताना 34 हजारांपेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, अशी माहिती त्यांनी दिली. 460किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या या ट्रॅकमध्ये एकूण 26 किलोमीटर बोगदे, 27 लोखंडी पूल, 12 स्टेशन्स आणि 7 किलोमीटर अंडरग्राऊंड बोगदे, इतर सुपर स्ट्रक्चर्स आहेत. बांधकाम चालू असताना 75 लाख टन सिमेंट आणि 21 लाख टन स्टील वापरण्याचा अंदाज आहे. यामुळे संबंधित उद्योगांमध्ये आणि त्यांच्याशी संबंधित पुरवठा शृंखलामध्ये रोजगाराच्या अतिरिक्त संधीही निर्माण होतील.2016मध्ये स्थापन झालेल्या या महामंडळाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, बांधकामाशी संबंधित काही महत्त्वाच्या कामांच्या निविदा येत्या दोन महिन्यांत खुल्या केल्या जातील आणि त्या अंतिम असतील. जपान सहाय्य प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाचे औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2017मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे केले.

टॅग्स :बुलेट ट्रेन