मुंबई : अंधेरी ( पूर्व) एमआय डीसी येथील कामगार रुग्णालयाला दि,१७ डिसेंबर २०१८ साली भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला व १५० जण जखमी झाले. तेंव्हापासून आजपर्यंत हे रुग्णालय बंदच आहे.मात्र तब्बल ४ वर्षे आणि ८ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व दिनी येत्या मंगळवार दि,१४ ऑगस्ट २०२३ रोजी येथे पहिला टप्यात सुरू होणाऱ्या ओपीडी सुरू होणार आहे.तर फेब्रुवारी २०२४ मध्ये सदर हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.
केंद्रीय कामगार कल्याण मंत्री भूपेंद्र यादव व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतुला यांनी लोकमतला दिली.
कामगारांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याने अंधेरीतील हे रुग्णालय लवकर सुरु करावे अशी मागणी मुतुला यांनी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री भारती पवार यांनी केली होती.तर मुंबईचे माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी याप्रकरणी गेली दोन वर्षे पाठपुरावा केला होता.तर आपण सदर हॉस्पिटल लवकर पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी येत्या दि,२३ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर २०१८ पासून लोकमत ऑनलाईन व लोकमत मध्ये सातत्याने हा विषय मांडला आहे.
केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांनी सदर हॉस्पिटल लवकर सुरू होण्यासाठी जातीने लक्ष घातले.दि,२९ जुलै,दि,११ जानेवारी,दि,२१ फेब्रुवारी, दि, ३ मार्च रोजी त्यांनी हॉस्पिटलचे काम सुरू करण्यासाठी नॅशनल बिल्डिंग्स कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी) सोबत विविध आढावा बैठका घेतल्या. या विषयावर चर्चा करण्यासाठी अलीकडेच महासंचालक ईएसआयसी आणि एनबीसीसीचे संचालक यांची बैठक झाली. त्यानंतर मुख्य अभियंता ईएसआयसी कार्यकारी व संचालक एनबीसीसीच्या विविध बैठका पार पडल्या. एनबीसीसीने कार्यआदेश दिल्यानंतर ओपीडीचे काम तीन महिन्यांत कामे पूर्ण केले गेले आणि डिसेंबर २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे एनबीसीसीशी चर्चा केली आहे.
शिल्लक कामाच्या अंमलबजावणीसाठी आणि परफॉर्मन्स बँक गॅरंटी जमा करण्यासाठीची अंतिम संमती एनबीसीसी कडून पुष्टी केली जाईल कामासाठी पैसे कमी पडणार नाही असा आश्वासन इएसआयसीसी कडून देण्यात आले. दि,२ जुलै रोजी कामाची पाहणी करण्यासाठी इएसआयसीसी कडून आपल्याला बोलवण्यात आले होते अशी माहिती भीमेश मुतुला यांनी दिली.
या रुग्णालयाच्या इमारतिच्या 'ए' आणि 'ई' विंगच्या तळापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत ओपीडीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पीजी रुग्णालय आणि कर्मचारी निवासमधील ही काही दुरुस्ती करण्यात आले आहे. तसेच ओटी ब्लॉक ,बेसमेंट व तळमजला पासून पाचव्या मजला आणि आयपीडी ब्लॉक बेसमेंट व तळमजला पासून सातवा मजलाचे स्ट्रक्चरचे काम पूर्ण झाले आहे आणि फिनिशिंगची कामेही पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत .सोबत एफएसआय मंजुरी आणि फायर एनओसी मिळवण्यासाठी एमआयडीसीला पत्र दिले आहे अशी माहिती मुतुला यांनी दिली.
कामगार वर्गाकडून स्वागत
सदर हॉस्पिटल मध्ये ओपीडी दि,१४ पासून सुरू होणार असल्याने येथील कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.कांदिवलीच्या कामगार हॉस्पिटल मधील कर्मचारी, टेक्निशियन,डॉक्टर आणि अधिकाऱ्यांच्या अंधेरी कामगार हॉस्पिटलच्या ट्रान्स्फर ऑर्डर निघण्यास सुरवात झाली आहे.तर अंधेरी हॉस्पिटल परिसराची स्वच्छता व रंगरंगोटी जोऱ्यातसुरू आहे.लोकमतने सातत्याने या प्रकरणी आवाज उठवूनकेंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधल्याबद्धल येथील कामगारांनीलोकमतला खास धन्यवाद दिले.
आग लागण्यापूर्वी कसे होते हॉस्पिटल
१७ डिसेंबर २०१८ साली भीषण आग लागण्यापूर्वी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या या रुग्णालयात ओपीडी,आयपीडी( ३५०बेड्स),आयसीयू आणि सुपर स्पेशालिटी सुविधा २४ तास सुरु होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओल़ॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटसह सर्व सोयी सुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते. ओपिडी विभागात दररोज १८०० ते २००० रुग्ण भेट देत होते, ब्ल़ड बँकेची सुविधाही उपलब्ध होती. महाराष्ट्रातील अनेक शहरातील कामगार अंधेरीच्या हॉस्पिटमध्ये उपचारासाठी येत होते. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या.