मनोहर कुंभेजकर, मुंबई- बोरिवली पश्चिम बाभई येथील स्मशानभूमी गेल्या ऑक्टोबर पासून बंदच आहे. परिणामी बोरीवलीकरांना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येथील बाभई येथील गॅसच्या स्मशानभूमीवर जावे लागते. यामध्ये शोकाकूल कुटुंबाला अंत्यसंस्कार होण्यासाठी तात्कळत थांबावे लागते.
आपण या संदर्भात पालिकेने वारंवार तक्रारी केल्या,मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. जर येत्या १० दिवसात सदर स्मशानभूमी सुरू केली नाही तर पालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयावर आपण भूक हारताळ करणार असल्याचा इशारा येथील ८० वर्षीय सामाजिक कार्यकर्त्या मीरा कामत यांनी येथील सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांना एका पत्राद्वारे दिली आहे.
माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये पालिका प्रशासनाला पत्र देवून सदर स्मशानाची दुरुस्ती लवकर करावी आणि स्मशानभूमी लवकर सुरू करावी असे निर्देश दिले होते.मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे कामत यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
यासंदर्भात येथील चोगुले कुटुंबाने सांगितले की, आमच्या कुटुंबाची शेकडो वर्षा पासूनची ही हिंदू स्मशानभूमी असून नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही सदर जागा पालिकेला वापरायला दिली.गेल्या ऑक्टोबर मध्ये पालिकेने सदर स्मशानभूमी मोडकळीस आली म्हणून बंद केली.आम्ही स्मशानभूमीची दुरुस्ती करा अशी मागणी पालिका प्रशासन व माजी खासदार शेट्टी यांच्या कडे केली होती. मात्र स्मशानभूमी दुरुस्त करण्याच्या पालिका प्रशासनाच्या काहीच हालचाली दिसत नाही. हिंदूंसाठी असलेली सदर स्मशानभूमी अन्यत्र नेण्यास आमच्या चोगुले कुंटुंबाचा आणि स्थानिकांचा कडाडून विरोध राहील हे या कुटुंबाने स्पष्ट केले.