'बेस्ट'ची ओपन डेक डबल डेकर बस आता हद्दपार होणार, पर्यटकांना धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 03:38 PM2023-09-05T15:38:48+5:302023-09-05T15:39:54+5:30
मुंबई शहरात पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलेली डबल डेकर ओपन डेक बस आता बंद होणार आहे.
मुंबई शहरात पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलेली डबल डेकर ओपन डेक बस आता बंद होणार आहे. बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयामुळे पर्यटकांना धक्का बसला आहे. बेस्टच्या या निर्णयामुळे आता ऑक्टोबर महिन्यापासून ओपन डबल डेकर बसमधून होणारे 'मुंबई दर्शन' आता पर्यटकांना करता येणार नाही. ५ ऑक्टोबरपासून बेस्टची डबल डेकर ओपन डेक बस सेवा बंद होत आहे. त्यानंतर सध्यातरी ओपन डेक बस चालवण्याचा बेस्टचा कोणताही विचार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
सध्या बेस्टच्या तीन ओपन डेक डबल डेकर सेवेत आहेत. पण त्यांचं आयुर्मान संपल्यामुळे जुन्या बस आता हद्दपार होणार आहेत. त्यातच ५० नवीन ओपन डबल डेकर बस खरेदीसाठीची काढलेली निविदा देखील रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे बेस्टच्या माध्यमातून केले जाणारे मुंबई दर्शन आता ऑक्टोबरपासून बंद होणार आहे.
मुंबईतील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी २६ जानेवारी १९९७ पासून एमटीडीसीच्या मदतीने ओपन डेक बस सेवा सुरु करण्यात आली होती. दर महिन्याला जवळपास २० हजार पर्यटक या बस सेवेचा लाभ घेत असल्याची आकडेवारी आहे. सध्या बेस्टकडे ३ डबल डेकर ओपन डेक बस आहेत. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या तिन्ही बस टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आला आहे.