'शिवस्मारक घोटाळ्याबाबत खुली चर्चा करा', चंद्रकांत पाटलांना ओपन चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 09:39 PM2019-10-01T21:39:26+5:302019-10-01T21:39:47+5:30
शिवस्मारकातील भ्रष्टाचार संतापजनक आणि असहनीय, सरकारतर्फे धादांत खोटी उत्तरे
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे अराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मारकात झालेला भ्रष्टाचार हा अतिशय संतापजनक व असहनीय आहे. सरकारकडून या प्रकाराची चौकशी करण्याकरिता टाळाटाळ केली जात असून भ्रष्टाचार झाकण्यासाठी धादांत खोटी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे सरकारतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली उत्तरे उडवाउडवीची असल्याने हिम्मत असेल तर सरकारने खुल्या चर्चेला यावे, असे जाहीर आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे.
या संदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील भ्रष्टाचार आम्ही पुराव्यासह उघड केला आहे. शिवस्मारक प्रकल्पाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी देखील भ्रष्टाचाराला अधोरेखीत करून चौकशीची मागणी केली होती. असे असतानाही सरकारकडून या प्रकरणाच्या चौकशीची टाळाटाळ केली जात आहे. जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत याकरिता हिंमत असेल तर सरकारने खुल्या चर्चेला यावे. चंद्रकांत पाटील किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांने लवकरात लवकर आपल्या पसंतीच्या व्यासपीठावर चर्चेला यावे असे खुले आव्हान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना दिले आहे. या प्रकरणात “दूध का दूध पानी का पानी” होऊनच जाऊ द्या असे सावंत म्हणाले.
शिवस्मारकाचे टेंडर ३८२६ कोटींचे असताना कमी रकमेचं टेंडर काढण्यात आले. त्याची किंमत २६९२ कोटीची करण्यात आली. त्यातही २५०० कोटी कमी करतो असे L&T कंपनीने सांगितले. L&T कंपनीने ४२% ने टेंडर भरतो असं दाखवले. मात्र प्रत्यक्षात १२०० कोटीने कमी केले. हा सरकारचा वेल प्लॅन भ्रष्टाचार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून त्यांच्याच वरदहस्ताने एक हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. लवकरच याबाबत आम्ही सीवीसीकडे तक्रार करणार आहोत. जर दखल घेतली गेली नाही तर कोर्टात दाद मागणार आहोत. शिवस्मारकाच्या कामात सरकारने घोटाळा केल्याचा आरोप गेल्या पत्रकार परिषदेत आम्ही केला होता. या घोटाळ्याचा पार्ट - २ आम्ही काढणार असेही मागच्या वेळ नमूद केला होतं. त्यानुसार आज पुन्हा या भ्रष्ट सरकारचा भांडाफोड केल्याचं मलिक यांनी सांगितलं.