Join us

उघड दार देवा आता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:06 AM

राज्यात अनलॉक तरीही मंदिरे बंदचलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याने आता अनेक ठिकाणी ...

राज्यात अनलॉक तरीही मंदिरे बंदच

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याने आता अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. असे असले तरी अद्याप मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी बंदच आहेत. यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या बाहेर असणारे हार विक्रेते, मिठाई विक्रेते यांचे देखील आर्थिक गणित कोलमडले आहे. भक्तांनाही गेले अनेक दिवस केवळ मंदिराबाहेरून कळसाचे दर्शन घ्यावे लागत आहे. यामुळे त्यांनाही देवाच्या भेटीची ओढ लागली आहे.

मुंबईत सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी, बाबुलनाथ अशी मोठी मंदिरे आहेत. यासोबतच प्रत्येक विभागात काही मोठी मंदिरे आहेत, या ठिकाणी दररोज घेण्यासाठी भक्तांची गर्दी लोटते. मात्र आता या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंदिरे आता कधी खुली होणार याची सर्वजण वाट पाहत आहेत.

किती दिवस कळसाचेच दर्शन?

आपण कोरोनाच्या पहिला लाटेतून सावरल्यानंतर अनेक धार्मिक स्थळांवर गर्दी केली होती. परिणामी दुसऱ्याला लाटेचा प्रकोप आपल्याला पाहायला मिळाला. आत्ताही आम्हा भक्तांना देवाच्या भेटीची ओढ लागली आहे. मात्र शासनाच्या नियमांचे पालन करावे लागत आहे. त्यामुळे आता नेमकी मंदिरे कधी खुली होणार याबाबत प्रश्न पडला आहे.

- परेश भोईर

सरकारने ज्या प्रमाणे हळूहळू अनलॉकला सुरुवात केली आहे, त्याचप्रमाणे कडक नियमांच्या निर्बंधांखाली मंदिरेदेखील खुली करायला हवीत. मंदिरांमध्ये गेल्यावर भक्तांना सकारात्मक ऊर्जा मिळते, त्याचप्रमाणे दिवसदेखील अगदी प्रसन्न जातो. इतके दिवस मंदिराच्या बाहेरूनच देवाचे दर्शन घेत आहे. मात्र आता मंदिरांच्या आत जाऊन देवाचे दर्शन घेण्याची ओढ लागली आहे.

- रमाकांत म्हात्रे

आर्थिक गणित कोलमडले

मंदिरात येणाऱ्या भक्तांवरच आमचा व्यवसाय अवलंबून असतो. मागील दोन वर्षे व्यवसाय पूर्णपणे ठप्प असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सरकारने आमच्या व्यथांकडे लक्ष द्यावे. तसेच मंदिरांवर व्यवसाय अवलंबून असलेल्यांना आर्थिक मदत करावी.

- उल्हास चौगुले (मिठाई व फ्रेम विक्रेते)

हारांचा व्यवसाय हा आमचा कौटुंबिक व्यवसाय आहे. घरातील इतर सदस्य कुठेच कामाला नसल्याने पूर्णपणे या व्यवसायावरच आमची उपजीविका चालते. मात्र मंदिर बंद असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने आमच्या व्यथा लक्षात घेऊन मंदिरे लवकरात लवकर सुरू करावीत.

- रेवती साळवी (हार विक्रेते)

मंदिरे बंद असली तरीदेखील सकाळ-संध्याकाळ नियमित देवाची पूजा केली जाते. भक्तांची कमी जाणवते मात्र अनेक जण मंदिरात बाहेरून दर्शन घेतात. नवीन वाहनांचे पूजन करण्यासाठी ते मंदिराबाहेर आपली वाहने घेऊन येतात. मात्र असे असले तरी कोरोनाचे नियम पाळणे आणि शासनाच्या नियमांचा आदर करणे गरजेचे आहे.

- मंदार विभुते (पुजारी)

(फोटो - सिद्धिविनायक गणेश मंदिर चेंबूर नाका)

............................................