मानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:40 PM2020-09-27T23:40:12+5:302020-09-27T23:40:36+5:30
वाचकप्रेमी-कर्मचाऱ्यांमधून होतेय मागणी : शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
स्वप्नील कुलकर्णी ।
मुंबई : अनलॉक झाल्यानंतर वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवावा लागला. कोरोनामुळे सार्वजनिक वाचनालये बंदच असल्यामुळे सामान्य नागरिक मानसिकरीत्या पुरता हवालदिल झाला आहे. सध्या मुंबई शहरात २९, उपनगरांत ४५, तर ठाणे आणि पालघरमध्ये १४३ सार्वजनिक ग्रंथालये असून अनेक ग्रंथालयांना यावर्षीच्या अनुदानाचा दुसरा टप्पा मंजूर होऊनही मिळालेला नाही. त्यामुळे येथे काम करणाºया हजारो कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थतीत ग्रंथालयांची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी शासनाने ग्रंथालय सुरू कारण्याबाबत योग्य ती मार्गदर्शक तत्त्वे तयार करून ग्रंथालयाची कवाडे खुली करावीत, अशी मागणी वाचक आणि कर्मचाºयांमधून होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात आलेले नैराश्य वाचनातून दूर होऊ शकते. हा एकाकीपणा दूर करून जगण्याची जिद्द देणाºया पुस्तकांना वाचकांपासून दूर ठेवण्यात येत आहे. पुस्तके देवाणघेवाणीतून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. यामुळे सार्वजनिक ग्रंथालये बंद आहेत. पुस्तकांची दुकाने काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली आहेत. मोठे मॉल्सही शासनाने घालून दिलेल्या कोरोनाबाबत मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू झाले आहेत. वास्तविक पाहता बाजारपेठेतील सर्व व्यवहार सुरू झाल्यानंतर ग्रंथालये सुरू करण्यास काहीच हरकत नव्हती. पण ग्रंथालये सात महिन्यांपासून बंद असल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाला आधी वर्षाचा संपूर्ण खर्च करावा लागतो, नंतर सरकार अनुदान देत असते. पण व्यवहारच बंद असल्याने व्यवस्थापनांपुढे अडचणी आहेत.
मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ग्रंथालयांतील पुस्तकांचे नुकसान झाले आहे. पाऊस, वाळवी यामुळे अनेक ठिकाणची ग्रंथसंपदा नष्ट होते की काय अशी परिस्थिती आहे. यातच अनेक ग्रंथालयांना यावर्षीच्या अनुदानाचा दुसरा टप्पा घोषणा होऊनही मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाºयांचे वेतन, ग्रंथ खरेदी-विक्री आणि इतर खर्च कसे भागवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत ग्रंथालयांची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करून ग्रंथालये सुरू करायला हवीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी थांबली
सध्या सगळीकडे स्पर्धा परीक्षा सुरू आहेत. अशा वेळी तर वाचनालये विद्यार्थ्यांचा मुख्य आधार असतो. त्यामुळे वाचनालये लवकरात लवकर खुली करणे आवश्यक आहे. वाचनालयातील अध्ययन कक्षाचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना संदर्भग्रंथ, वृत्तपत्रे आदींद्वारे फायदा होत असतो. मात्र गेल्या सात महिन्यांपासून वाचनालये बंद असल्याने त्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. या परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी थांबली असून, विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे.
योग्य ती खबरदारी घेऊन, तसेच शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करून ग्रंथालये सुरू करता येतील. ३० सप्टेंबरनंतर शासनस्तरावर काय निर्णय घेतला जातोय, त्यावर सगळे अवलंबून आहे. त्याबद्दल होणारा निर्णय सार्वजनिक ग्रंथालयांना कळवला जाईल.
- भीमराव जिवणे,
प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, मुंबई
सध्या ग्रंथालये बंद आहेत. मात्र, आम्ही पुस्तकांची देखभाल आणि कार्यालयीन कामकाजासाठी येत आहोत. पुढील महिन्यात ग्रंथालय सुरू केले, तर आम्ही शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करून नियोजन करू.
- अश्विनी पाठक,
ग्रंथपाल, दादर
सार्वजनिक वाचनालय