नोकरीचे आमिष दाखविणारी टोळी उघड
By admin | Published: January 3, 2015 02:08 AM2015-01-03T02:08:12+5:302015-01-03T02:08:12+5:30
महापालिकेत नोकरी देतो असे सांगत संबंधितांकडून एक ते दीड लाख रुपये उकळणाऱ्या टोळीचा एफ/दक्षिण विभागातील सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला
मुंबई : महापालिकेत नोकरी देतो असे सांगत संबंधितांकडून एक ते दीड लाख रुपये उकळणाऱ्या टोळीचा एफ/दक्षिण विभागातील सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणी संबंधित टोळीविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एफ/दक्षिण विभाग कार्यालयात व बाहेरील परिसरात काही संशयित इसम व काही तरुण मुले फिरताना सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. यावर त्यांनी सदर इसम व मुलांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे महापालिकेचे नाव असलेली बोगस मुलाखत पत्र व त्याकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी आढळली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्या इसमांना ताब्यात घेतले. शिवाय त्यांची बॅग आणि इतर साहित्याची तपासणी केली असता त्यामध्ये महापालिकेच्या नावाचा वापर केलेले बोगस मुलाखत पत्र व बनावट अर्ज मोठ्या प्रमाणात आढळून आले.
पोलिसांनी या इसमांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांची नावे रवींद्र पवार व प्रकाश गायकवाड असल्याचे समजले. या दोन्ही इसमांनी उमेदवारांना महापालिकेत नोकरी देतो असे सांगत बोगस मुलाखत पत्र देऊन एक ते दीड लाख रुपये उकळल्याचे समजले. यावर भोईवाडा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तक्रारीनुसार भोईवाडा पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)